वाढत्या थंडीमुळे जनावरांवर परिणाम; दूध उत्पादनात घट | Milk Production | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

milk

नाशिक : थंडीमुळे दूध उत्पादनात घट

येसगाव (जि. नाशिक) : ग्रामीण भागात (Rural area) शेतीपुरक व्यवसाय या नात्याने बहुसंख्यजण दुग्ध व्यवसायाला (Dairy business) प्राधान्य देतात. ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट करणारा दुग्धव्यवसाय नेहमी पावसाळा, उन्हाळा तसेच हिवाळ्यातही अडचणीत येतो. दुभत्या पशुधनाची तीनही ऋतूत परवड होते. पावसाळ्यात तसेच नुकत्याच डिसेंबरच्या पूर्वार्धात झालेल्या अकाली पावसामुळे बऱ्याच भागात चारा सडला. आधीच पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. त्यात चाराटंचाई, पशुखाद्य महागाईमुळे पशुपालकांचे कंबरडे मोडले. जिवापाड जपलेल्या दुभत्या पशुधनाला कसे जपावे असे संकट दूध उत्पादकांना पडते. थंडीच्या लपंडावामुळे दुभते जनावर गाई - म्हशींवर परिणाम झाला असून, दुग्ध उत्पादनात घट झाली आहे.

कडक थंडीमुळे जनावरे हैराण

वाढत्या थंडीच्या काळात दुभत्या जनावरांना माशा, डासांचा त्रासही मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या आठवड्यापासून थंडीने पुन्हा जोर धरला असून, दुधात दहा लिटरमागे सरासरी दीड ते दोन लिटर दूध घटू लागले आहे. परिसरात बागायती पिके असल्याने थंडीचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. सायंकाळी व पहाटे गाई-म्हशींचे दूध काढले जाते. त्यावेळी कडक थंडीमुळे जनावरे हैराण झाली आहेत. दुभत्या जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर वारंवार परिणाम होत आहे असे पशुपालकांचे म्हणणे आहे. सध्या वैरणीसाठी कोरडा चारा म्हणून फक्त मक्याचा चारा वापरला जातो. हिरवा चारा ही जनावरांना दिला जातो. हिरव्या कोरड्या चाऱ्यातही संतुलित आहार नाही. म्हणून सर्वच मोठ्या जनावरांना दुधासाठी पशुखाद्य द्यावे लागते. चौफेर महागाईमुळे ढेप व सरकी कमालीची महाग झाली आहे. वातावरणात उष्णता नसल्याने दुभती जनावरे दिवसातून पाणीही कमी वेळा किंवा पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. थंडीतही पशुधनाच्या आहाराची व प्रकृतीची काळजी घ्यावी लागत आहे.

हेही वाचा: नाशिक : दोघांचे भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला

रात्री जनावरे गोठ्यात बांधली तरी यांच्या अंगावर शिवलेले बारदान टाकण्यात येते आहे. थंडी लागणार नाही यासाठी जनावरे आडोशाला बांधली जातात. बऱ्याचदा शेतातील गोठया भोवती पालापाचोळा जाळण्यात येतो. त्यामुळे गोठ्यात उष्णता वाढण्यास मदत होते. दिवसा जनावरांना ऊन मिळण्यासाठी बाहेर बांधावे लागतात. लग्नसराई सुरू झाली असून, त्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांना (खवा, दही, पनीर, मावा, पेढे, बासुंदी, रबडी, मिठाई आदींना) मागणी वाढते. उत्पादन कमी झाले असले तरी मागणी व पुरवठा चांगला आहे. मात्र, खाद्याची दरवाढ दुग्ध व्यावसायिकांना मारक ठरत आहे.

खाद्याचे दर असे (प्रतिकिलो)

सरकी : ६० किलोसाठी दोन हजार ५० रुपये
चुनी : ५० किलोसाठी ८८० ते ९०० रुपये
मका भरडा : ५० किलोसाठी एक हजार ३० रुपये

उपाययोजनांची गरज

पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अति थंडीमुळे जनावरांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. स्नायू आखडतात, रवंथ कमी होते, सडांवर भेगा पडतात. दूध काढू देत नाही. ऊर्जेची गरज वाढते. भेगांवर ग्लिसरीनचा वापर करावा. कास गरम कोमट पाण्याने धुवावे. भरपूर कडबा द्यावा. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त होते. पान्हा सोडत नाही. पाणी कमी पितात. भरपूर पाणी पिण्यासाठी गरम वा कोमट पाणी पाजावे. पोषक चारा व ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थयुक्त आहार द्यावा. गोठ्यात रात्री जास्त वॅटची बल्ब लावावे. गोठ्याला उतार व स्वच्छ असावा. गोठ्याच्या खिडकीला रात्री पोत्याचे पडदे लावावेत.

हेही वाचा: ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top