परराज्यातील आंब्यावरच अक्षयतृतीयेची भिस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raw Mangoes

परराज्यातील आंब्यावरच अक्षयतृतीयेची भिस्त

देवळा (जि. नाशिक) : कसमादेसह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील आंबा (mango) अद्याप पक्व न झाल्याने कोकण (konkan) वा परराज्यातील आंब्यावरच अक्षयतृतीया (Akshay tritiya) साजरी करावी लागणार असे चित्र आहे. आंब्याचे आगमन झाले असले तरी या सणाला फळांचा राजा (King of Fruits) तसा आंबटच असणार आहे. आंब्यांच्या रसाचा नैवेद्य (आगारी) पूर्वजांना दाखवून हा सण साजरा केला जातो म्हणून या सणाला विकतच्या आंब्यावरच भूक भागवावी लागणार आहे. (Demand for mangoes in Akshay Tritiya Late arrival in the market Nashik News)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षयतृतीया हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरणपोळीचे (Puranpoli) सुग्रास जेवण हा त्यातील एक महत्वाचा भाग असतो. आमरसाच्या पंगतींना खऱ्या अर्थाने या सणापासूनच सुरुवात होते. दरवर्षी बाजारात पुरेसा आंबा येतोच असे काही नाही. परंतु, यावर्षी बदाम, लालबाग, केशर, हापूस, पायरी या व इतर प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. कोकणातून व केरळ- गुजरात- कर्नाटकातून येणाऱ्या या आंब्यांना मोठी मागणी आहे. देवळा व कळवण तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात गावठी व आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. काही शेतकऱ्यांनी फळशेतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाडे लावून आमराया वाढवल्या आहेत. परंतु, अजून या कैऱ्या परिपक्व झाल्या नाहीत. अर्थात, या भागातील आंबे अजून पिकले नसल्याने कोकणातून आलेल्या आंब्यावरच सण साजरा करावा लागणार आहे. याशिवाय मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे आंब्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंच टेन्शन नको, आम्ही बघू; पवार, भुजबळांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

यावर्षी कळवणसह या भागातील आंब्यांना मोहोर चांगला आल्याने आंब्याचे चांगले उत्पादन होईल असा अंदाज आहे. पण, तापमानात एकदम वाढ झाल्याने लहान आकाराची फळे गळून पडली. तर काही भागात बेमोसमी पावसाने दगा दिला. यामुळे आंब्याच्या उत्पादनाला काहीअंशी झटका बसला आहे. अक्षयतृतीया सणानिमित्त आंबा बाजारात आला असून, त्याचे भाव किमान १२० ते कमाल २५० रुपये किलो आहेत. सणापुरता आंबा घेण्याकडे ग्रामीण भागातील जनतेचा कल राहील.

हेही वाचा: नाशिक : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता

गौराई व झोक्यावरची गाणी नामषेश
ग्रामीण भागात चैत्र पोर्णिमेपासून अक्षयतृतीयेपर्यंत गौराईची स्थापना प्रत्येक घरी केली जात असे. लाकडी शंकर- पार्वती असे गौराईचे रूप असे. त्यावर गुंज, पानाफुलांची पत्री लावून घरातच आकर्षक सजावट मुली व महिलावर्ग करत असे. या दिवसांत घरात, झाडांच्या फांद्यांना व इतर सोयीच्या ठिकाणी बांधलेल्या झोक्यावर ‘गौर मनीं सई वं- आता कधी येशी वं’ अशी गौराईची गाणी मोठ्या आवडीने गायिली जात. परंतु, काळाच्या ओघात व मोबाईलच्या जमान्यात आता गौराई, गौराईची गाणी व झोका मागे पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

"बाजारात दाखल होणारा काही आंबा हा नैसर्गिक पद्धतीने न पिकवता तो बहुतांश करून कॅल्शिअम कार्बाइडसारख्या रसायनांच्या मदतीने पिकवला जातो. असा आंबा चहुबाजूने पिवळा दिसतो. यामुळे त्याची मूळ चव बदलून तो आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक व हानिकारक ठरू शकतो. म्हणून आंबा खरेदी करताना देठाजवळ पिवळा असलेला व देठाच्या विरुद्ध बाजूस हिरवा असलेला आंबा खरेदी करावा. असे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे बाजारात येणार असल्याने नागरिकांनी घाई करू नये."
- गंगाधर पगार, आंबा उत्पादक, वडाळीभोई (ता. चांदवड)

Web Title: Demand For Mangoes In Akshay Tritiya Late Arrival In The Market Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top