esakal | रेमडेसिव्‍हिरसाठी नागरिकांकडून ई-मेलचा पाऊस! नियंत्रण कक्षावर वाढला ताण
sakal

बोलून बातमी शोधा

remdesevir

रेमडेसिव्‍हिरसाठी नागरिकांकडून ई-मेलचा पाऊस! नियंत्रण कक्षावर वाढला ताण

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : रेमडेसिव्‍हिरचा तुटवडा लक्षात घेता, शासकीय निकषांद्वारे आवश्‍यक रुग्‍णांपर्यंत थेट कोविड रुग्‍णालयांना इंजेक्‍शन पुरविले जात आहे. त्‍यासाठी रुग्‍णालयांनी ई- मेलवर मागणी नोंदवायची आहे. परंतु ई-मेलचा संदेश व्‍हायरल झाल्‍याने थेट सुमारे चार हजार नागरिकांनीच या ई-मेलद्वारे इंजेक्‍शनची मागणी नोंदविली आहे. या अजब प्रकारामुळे नियंत्रण कक्षावरील ताण मात्र वाढला आहे.

रेमडेसिव्‍हिरसाठी मागणीचा पाऊस

जिल्‍हा प्रशासनाने जारी केलेल्‍या प्रणालीनुसार थेट कोविड रुग्‍णालयांना रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन उपलब्‍ध करून दिले जात आहे. त्‍याकरिता संबंधित रुग्‍णालयांनी रोज सकाळी नऊपर्यंत संभाव्‍य इंजेक्‍शनबाबत विहित नमुन्‍यात मागणी नोंदविण्याचे आवाहन केले होते. रुग्‍णालयांसोबत सर्वसामान्‍यांनीदेखील या ई-मेलवर मागणी नोंदविल्‍याने यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्‍णांच्‍या नातेवाइकांनी परस्‍पर वैयक्‍तिक स्‍वरूपातील मागणीचा ई-मेल पाठविल्‍यामुळे नियंत्रण कक्षाचा वेळ वाया जात आहे. वैयक्तिक स्‍तरावर इंजेक्‍शन उपलब्‍ध करून दिले जाणार नसल्‍याचे यापूर्वीच जिल्‍हा प्रशासनाने स्‍पष्ट केले आहे. त्‍यामुळे वैयक्‍तिक स्‍वरूपाचे ई-मेल न पाठविण्याचे घटना व्‍यवस्‍थापक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी कळविले आहे.

नियंत्रण कक्षावर वाढला ताण : रुग्‍णालयांना मागणीच्‍या सूचना

रेमडेसिव्‍हिर मागणीसाठी जारी केलेला ई-मेल हा केवळ रुग्‍णालयांकरिता आहे. वैयक्‍तिक स्‍तरावर रुग्‍णांच्‍या नातेवाइकांचे चार हजारांहून अधिक ई-मेल आले असून, हे अपेक्षित नाही. यामुळे कक्षाचा वेळ जात आहे. रुग्ण किंवा त्‍यांच्‍या नातेवाइकांनी ई-मेलद्वारे मागणी करू नये, वैयक्‍तिक स्‍तरावर कुणालाही इंजेक्‍शन दिले जाणार नसल्‍याची नोंद घ्यावी.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी