दृष्टी गेली... पांडुरंगाची ओढ कायम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्टी गेली... पांडुरंगाची ओढ कायम!

दृष्टी गेली... पांडुरंगाची ओढ कायम!

यावल : दिव्यांग असूनही पांडुरंगाच्या भेटीची आस मनी असल्यामुळे एक नव्हे, दोन नव्हे तर गेल्या वीस वर्षांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी वारी करणारे माचले (ता. चोपडा) येथील प्रभाकर वामन निकम (वय ६२) या वृद्ध पांडुरंग भक्ताची जिद्द डोळसपणाला लाजवणारी आहे. माचले येथे १४ एकर बागायती शेती, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा प्रपंच असूनही श्री. निकम यांनी गेल्या वीस वर्षांपासून वारकरी संप्रदायाला वाहून घेत परमार्थ पत्करला आहे. श्री. निकम वीस वर्षांपासून पंढरपूर येथे पायी वारी करतात. त्यातही बारा महिन्यांची दरमहा पायी वारी त्यांनी सुरू केलीय.

कृष्णपक्षात एक वारी संतांकडे, तर दुसरी वारी शुक्ल पक्षात पांडुरंगाकडे सुरू केली आहे. यासह विविध दिंडीत ते सहभागी होत असतात. श्री समर्थ सुकनाथ बाबा दरबार, वर्डी (ता. चोपडा) येथील आषाढी व कार्तिक एकादशी पायी दिंडी, श्री संत मुक्ताईची महाशिवरात्री किनगाव येथून निघणारी दिंडी, आळंदी, देहू, पंढरपूर येथील दिंडीत सहभाग असतो. मुक्ताईचा गुप्तदिन सोहळा, ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर येथे ३० किलोमीटर लांबीची प्रदक्षिणा, श्रावणातील निवृत्तिनाथ समाधी सोहळ्यासाठी उपस्थिती असते. संपूर्ण वर्षभर विविध दिंड्यांत सहभागी होऊन ते संत-महात्म्यांच्या पायाशी लीन होत असतात. यातच ते जीवनाचे सार्थक मानतात. मुलगा गावात उपसरपंच असूनही कधीही प्रपंचात लक्ष घालीत नाहीत.

ते स्वतः गेल्या दहा, अकरा वर्षांपासून नि:स्वार्थ भावनेने एक रुपयाचा मोबदला न घेता कीर्तन करत निष्काम सेवाभाव करीत आहेत. प्रभाकर निकम यांना लहानपणापासून डोळ्याने कमी दिसत होते. कालांतराने त्यांची दृष्टी गेली. तरीही त्यांचा पायी दिंडीचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. त्यात कधी खंड पडलेला नाही. त्यांच्या या प्रवासात माचले येथीलच वृद्ध वारकरी रघुनाथबाबा गोधा कोळी यांचीही साथ आहे. श्री. निकम हे रघुनाथ कोळी यांच्या खांद्यावर हात ठेवूनच पायी दिंडीत न अडखळता आजही अव्याहतपणे मार्गक्रमण करीत आहेत. शरीराने धडधाकट व डोळस असणाऱ्यांना लाजवेल असा हा अंध वृद्धाचा परमार्थिक प्रवास आहे.

Web Title: Despite Being Blind Desire To Visit Panduranga Vithoba

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikpandharpurwari