
Chhagan Bhujbal : येवल्यातील पाणी, वीज, रस्ते, मुक्तीभूमिचा विकास भुजबळांमुळेच! समर्थकांचे पत्रक
येवला (जि. नाशिक) : मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास, या घोषणेने येवल्याच्या जनतेची स्वप्नपूर्ती झाली आहे. येवला-लासलगाव मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विविध विकासकामे सहजपणे पूर्णत्वास जाऊ लागली, तर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
या सर्व कामांचे श्रेय फक्त आणि फक्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे आहे. इतर लोकप्रतिनिधींनी याचे श्रेय घेऊ नये असे आवाहन येथील पदाधिकारी व समर्थकांनी पत्रकाद्वारे केले आहे. (Development of water electricity roads Mukti Bhoomi in yeola is due to Bhujbal Supporters Leaflet nashik)
कानळद, चिंचोंडी, मुखेड, विखरणी, कोटमगाव, गवंडगांव, खडक माळेगाव व मरळगोई या ठिकाणी वीज उपकेंद्रे उभारली असून, जऊळके, सोमठाण देश, कोटमगाव, कुसुर, बल्हेमगांव, अंगुलगांव व येवला शहर या ठिकाणी नवीन उपकेंद्र मंजूर आहेत.
जिल्हा मार्गांसह राज्य मार्गाच्या नुतनीकरणासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच मतदारसंघातील पूल, रस्ते मजबूत झाले. कोटमगाव येथे २७ कोटी, तर लासलगाव येथे ७० कोटी रुपयांचा उड्डाणपूल, सारोळे येथील विनता नदीवर, खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आले.
मतदारसंघात धार्मिक स्थळांच्या विकासकामांसाठी ११० कोटी रुपये मंजूर केले. अनुसूचित जाती व आदिवासींच्या मुलांसाठी निवासी वस्तीगृहांची निर्मिती, रस्ते, पूल, बंधारे आदी कोट्यवधींची कामे भुजबळांमुळेच झाल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंतराव पवार, साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे आदींनी म्हटले आहे.
येथील ऐतिहासिक मुक्तीभूमीच्या विकासासाठी भुजबळ यांनी ५० कोटींचा निधी मंजूर करून, नेत्रदीपक वास्तूची निर्मिती केली आहे. आजही या ठिकाणी विकासकामे सुरू असल्याचे माजी सभापती प्रकाश वाघ, भागीनाथ पगारे, सुभाष गांगुर्डे यांनी म्हटले आहे.
सौंदर्यात पडली भर
शेकडो कोटींच्या निधीमधुन मध्यवर्ती प्रशासकीय संकुल, उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, नाट्यगृह, बोटिंग क्लब, मुक्तीभुमी स्मारक, पोलीस वसाहत, तात्या टोपे स्मारक, न्यायालय इमारत, ट्राफिक पार्क, अहिल्याबाई होळकर घाट, नगरपालिका शॉपिंग सेंटर, आदिवासी वस्तीगृह, पशुसंवर्धन दवाखाना, नगरपालिका प्रशासकीय इमारत, तालुका पोलीस स्टेशन, आयटीआय कॉलेज, तांत्रिक शाळा आदींसह अनेक इमारतींचे कामे पुर्ण झाल्याने शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
शहर व परिसरातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी भुजबळांच्या प्रयत्नांमुळेच शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले. शहरातील भूमिगत गटारीसाठी ७९ कोटी रुपये मंजूर झाले असून, शिवशृष्टीसाठी ४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पाणीयोजना केवळ भुजबळांमुळेच
भुजबळ यांच्या प्रयत्नातून तालुका टँकरमुक्त करण्यासाठी १८४ कोटी रुपये खर्चून कार्यन्वित झालेली ३८ गाव पाणीपुरवठा योजना आशिया खंडात आदर्शवत ठरली. त्याच धर्तीवर राजापूरसह ४२ गाव पाणीपुरवठा योजना, धुळगाव १७ गाव पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कार्यारंभ आदेश पारित झाला आहे.
सत्तेत असताना व नसतानाही भुजबळ यांचा पाठपुरावा सुरूच होता. योजनेसाठी जमीन खरेदीची तरतुदी नव्हती. तरीदेखील भुजबळांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची खासगी जमीन शासनास मोफत मिळवून दिली.
हे सामर्थ्य फक्त भुजबळांमध्येच असल्याचे समता परिषदेचे मोहन शेलार, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे यांनी म्हटले आहे. २०१४ पासून येवल्यात मोठ्या प्रमाणावर विकासात्मक बदल झाले असून, या विकास प्रक्रियेचे सामर्थ्य केवळ भुजबळांमध्येच आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई ही फोल वाटणारी व उथळ स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.