
नाशिक : फडणवीसांच्या ‘त्या’ चुकीने शिवप्रेमी नाराज
नाशिक : शिवसेना पक्षाला शह देण्यासाठी भाजपने मध्यंतराच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘जेथे नाही तेथे नाव’ घेत महाराजांबद्दल भला मोठा पुळका असल्याचे वातावरण निर्माण केले होते. शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांनी महाराजांचे नाव अक्षरशः हायजॅक केल्याचे दिसून आले होते. परंतु,भाजपचे हे बेगडी प्रेम विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावेळी स्पष्ट झाले.
एका कार्यक्रमातून ही बाब उघड झाल्याचे शिवप्रेमींच्या नजरेतून हे सुटले नाही. मात्र, हा प्रकार भाजपमधील दुफळीतून घडल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी अगदी जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन माजी मुख्यमंत्र्यांनी का घेतले नाही, हा आता आता चर्चेचा मुद्दा बनत आहे. भाजपच्या नाशिकमधील सत्ताधाऱ्यांनी अचूक नियोजन केले असते तर अशी वेळ पक्षावर ओढवली नसती.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर प्रथमच १९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच्या दोन दिवसांनी म्हणजे २१ फेब्रुवारीला पाथर्डी फाटा येथे पुतळ्याच्या उद्घाटनासाठी भाजप नेते, माजी मुख्यमंत्री व विरोधी नेत्यांसह केंद्रीय मंत्री, चार आमदार, दोन महापौर, पक्षाचे प्रवक्ते, शहराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे झालेल्या या कार्यक्रमात मोठे जल्लोषाचे वातावरण दिसून आले. परंतु, या कार्यक्रमापूर्वी माजी मुख्यमंत्री कमीत कमी येथे असलेल्या अश्वारूढ पुतळ्यावर स्वार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पुढील कार्यक्रमास सुरवात करतील, अशी अपेक्षा शिवप्रेमींना होती. परंतु तसे न केल्याचे दिसून आल्याने शिवप्रेमीमध्ये सध्या याबाबत कमालीच्या नाराजीचे वातावरण बघायला मिळत आहे.
यासंदर्भात एकाही नेत्याला छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून अभिवादन करावे, असे वाटू नये अथवा सुचू नये याबाबत कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे सर्व काही चांगले करत असताना दुसरीकडे अशाप्रकारे अगम्य दुर्लक्ष होणे म्हणजे हे जाणू-बुजून केलेली चूक असावी की यामागे काही राजकारण असावे की नजरचुकीने झालेला हा ‘करेक्ट’ कार्यक्रम असावा. याची गुथ्थी आता त्यांनीच सोडविणे आवश्यक असल्याचे शिवप्रेमींमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेला शिवसेना पक्ष हा ‘कळीचा मुद्दा’ करणार यात तिळमात्र शंका नाही.
Web Title: Devendra Fadnavis That Mistake Shivaji Maharaj Premi Annoyed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..