esakal | खानदेशचे दैवत चिराईमाता मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

Devotees are demanding that Chiraimata temple be given the status of a tourist destination

खानदेशचे दैवत चिराईमाता मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : चिराई (ता. बागलाण) येथील नाशिक-धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील जागृत देवस्थान शिवकालीन अर्धनटेश्‍वरी महालक्ष्मी मंदिराचे कोणत्याही शासकीय मदतीविना भाविकांच्या देणगीतून रूप पालटले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त कोरोनाचे नियम पाळून भाविक आदिमायेचे दर्शन घेत आहेत. चिराई येथील ग्राममंडळाच्या माध्यमातून मंदिराचा सर्वांगीण विकास होत आहे. शासनाने घनदाट वनराई लाभलेल्या मंदिरास पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन मंदिर परिसराचा विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

चिराई गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात अर्धनटेश्‍वरी महालक्ष्मीमातेचे अतिशय छोटेस शिवकालीन मंदिर होते. ‘चिराईमाता’ म्हणूनही येथील महालक्ष्मीमातेचा उल्लेख केला जातो. नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून चिराईमाता खानदेशात प्रसिद्ध आहे. कसमादे पट्ट्यासह खानदेशातील सुमारे २१ कुळांचे कुलदैवत म्हणून येथील मंदिराचा उल्लेख केला जातो. विवाहसोहळ्यानंतर तसेच, नवसपूर्तीसाठी नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात. सामाजिक कार्यकर्ते कारभारी अहिरे यांनी पाच गुंठे जागा मंदिर व्यवस्थापनाला दान दिल्यानंतर मंदिराच्या सभामंडपाला मूर्त स्वरूप मिळाले.

हेही वाचा: नाशिक : सायखेड्यात बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई

सुरवातीला नामपूर येथील निवृत्त पोलिस दगा बच्छाव यांनी चिराईमाता मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी चिराई येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून ग्राममंडळ स्थापन करण्यात आले. शासनाची कोणतीही मदत न घेता भाविकांच्या देणगीतून चिराई घाटात २००५ मध्ये सुमारे २२ लाख रुपये खर्चून देवीचे आकर्षक मंदिर उभरण्यात आले आहे. सध्याचा कोरोनाचा अपवाद वगळता चैत्र महिन्यात अष्टमी व नवरात्रकाळात भाविकांच्या गर्दीने मंदिर गजबजलेले असते. महालक्ष्मी मंदिरासमोरील प्राचीन दुर्गामाता मंदिराचाही सुमारे चार लाख रुपयांच्या विनियोगातून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. चिराईमाता मंदिराजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या काळात फक्त दगडात बांधलेले चिरीविहीर आकर्षक मंदिर आहे.

जागेसाठी वन विभागाकडून अडथळा

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला चिराईमाता मंदिराचा परिसर वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने मंदिर परिसरात विकासकामांना खीळ बसली आहे. वन विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जागेअभावी भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था, महिला प्रसाधनगृह, पिक-अप शेड आदी कामे प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींनी याकामी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

हेही वाचा: गोड-मधाळ सिताफळांची ग्राहकांना भुरळ; आदिवासींना मिळतोय रोजगार

loading image
go to top