NSK26H32908
धुळे ः तुळसाबाई मळा भागात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झालेले दुकान.
---
दुकानासह घर खाक; ७० लाखांचे नुकसान
---
तुळसाबाई मळ्यातील घटना; ‘महावितरण’च्या कारभारावर आरोप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः मिल परिसरातील चितोड रोडवरील तुळसाबाई मळा भागात बुधवारी (ता. १४) मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे गुरुदत्त प्रोव्हिजन ॲन्ड जनरल कटलरी स्टोअर्ससह घराला आग लागली. या दुर्घटनेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. मात्र, सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, वीजपुरवठ्यातील वारंवारच्या बिघाडांकडे ‘महावितरण’ने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप दुकानदाराने केला.
बुधवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही आग लागली. दुकानातील किराणा माल, घरातील टीव्ही, फ्रीज, फर्निचर, दोन एलसीडी टीव्ही आणि दोन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. यात दुकानदार भटू सुपनर यांच्या भावाच्या दुकानाचेही मोठे नुकसान झाले. आग लागली, तेव्हा घराच्या वरच्या मजल्यावर आजी-आजोबा आणि नातवंडे झोपली होती. आगीची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी बाजूच्या जिन्याने वर जाऊन धुरातून सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होणे, असे प्रकार घडत होते. याबाबत ‘महावितरण’कडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली नाही, असा आरोप सुपनर यांनी केला. शासन, महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक आमदारांनी या प्रकरणी लक्ष घालून नुकसानभरपाईसाठी मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे भय्या वाकळे, किशोर बडगुजर, नगरसेवक अमोल मासुळे, रावण नवले, प्रमोद ढापसे, किशोर सरगर, नगरसेवक नीलेश नेमाने, माजी नगरसेविका माधवी नेमाने, नगरसेविका सुरेखा उगले, शहर अभियंता चंद्रकांत उगले, जितेंद्र इखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.