लखमापूर- दिंडोरी: शहरातील बदादे वस्तीवरील ज्येष्ठ महिला जनाबाई जगन बदादे (वय ६५) ही महिला शेतात काम करत असताना शनिवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. महिलेच्या मानेचा लचका तोडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन महिन्यांत चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, महिलेच्या नातेवाइकांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर नातेवाइकांनी रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.