‘जिल्हाधिकारी’त आपत्ती निवारणाचे प्रात्यक्षिक
जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. यावेळी आपत्तीप्रतिकारक क्षमता बांधणी तसेच शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यात आली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. यंदाच्या जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाची ‘आपत्तीप्रतिकारक क्षमतेची सुरुवात घरापासून’ ही संकल्पना आहे. घर, कुटुंब आणि समाजस्तरावर आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्जता निर्माण करण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांच्या हस्ते वर्षभरात शोध व बचाव कार्यात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस विभाग, महानगरपालिका अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग, तहसील कार्यालये, आरोग्य विभाग, वन विभाग, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काउट्स व गाइड्स तसेच आपदा मित्र आणि इतर स्वयंसेवक सहभागी झाले होते.
---
कार्यक्रमात जनजागृती
- उंच इमारतीतील बचावकार्याचे प्रात्यक्षिक
- अग्निसुरक्षा व आग विझविण्याचे प्रात्यक्षिक
- आधुनिक शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन
- आपत्ती व्यवस्थापनासाठी सामूहिक सज्जतेवर भर
फोटो क्रमांक : एच-32289