Latest Marathi News | NMCच्या वतीने जंतुनाशक गोळी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Albendazole Tablets

National Disinfectant Day : NMCच्या वतीने जंतुनाशक गोळी वाटप

नाशिक : महापालिकेकडून राष्ट्रीय जंतुनाशक दिन मोहीम १० ऑक्टोबरला राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे १७ ऑक्टोबरला कृमी नष्ट मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना ‘अल्बेंडेझॉल’ ही जंतुनाशक गोळी मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

१ ते १९ वर्ष वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष’ हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. तसेच तो बालकांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरतो. (Disinfectant pill distribution on behalf of NMC on national Disinfectant Day 10 october Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट सक्रिय; शुक्रवारी NMCच्या प्रश्नावर चर्चा

कृमीदोषाचे परिणाम लक्षात घेऊन १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शाळा आणि अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतुनाशक गोळी देण्यात येणार आहे. बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, त्यांची पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे, हा राष्ट्रीय जंतुनाशक दिनाचा प्रमुख उद्देश आहे. ही मोहीम शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

१ ते २ वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी २०० मिलिग्रॅमची गोळी चुरा (पावडर) करून पाण्याबरोबर देण्यात येईल. २ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना ४०० मिलिग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे करून स्वच्छ पाण्याबरोबर चावून खाण्यास देण्यात येणार आहे. ‘अल्बेंडेझॉल’ ची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. गोळी खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

तथापि जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. या मोहिमेचे नियोजन माता व बाल संगोपन विभागाच्या अधिकारी डॉ. अजिता साळुंके करीत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : सिडकोत टवाळखोरांचा धुडगूस सुरूच!