Latest Crime News | सिडकोत टवाळखोरांचा धुडगूस सुरूच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : सिडकोत टवाळखोरांचा धुडगूस सुरूच!

नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगरमध्ये हातात हत्यारे घेऊन नागरिकांच्या घरांवर दगडफेक अन्‌ गेल्या आठवड्यात महाकाली चौकात हातात हत्यारे घेऊन युवकाच्या मागे धावणाऱ्या टवाळखोरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

मात्र त्यानंतरही टवाळखोरांकडून धुडगूस घालण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत तर, उलट अशा घटना सिडको परिसरात सातत्याने घडत असल्याने सिडकोवासिय दहशतीखाली आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून परिसरातील टवाळखोरांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. (Cidco goon crime continue Nashik Latest Crime News)

सिडको परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांकडून रात्रीच्या वेळी धुडगूस घालण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबड पोलिसांनी टवाळखोरांना अटक करीत कारवाई केली. परंतु, या टवाळखोरांविरोधात पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे टवाळखोरांचे उद्योग सुरूच आहेत.

सिडको परिसरात टवाळखोरांनी अड्डे निर्माण झाले असून, दिवस-रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकांना या टवाळखोरांचे अड्डे दिसत नाहीत का, असा प्रश्‍न त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे या टवाळखोरांकडून नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. टवाळखोर परिसरातीलच असल्याने नागरिकही पोलिसात तक्रार करण्यास धजावत नसल्याने या टवाळखोरांचे फावते आहे.

लेखानगर येथील औदुंबर बसथांबा येथील शेड रात्री टवाळखोरांचा अड्डाच बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच, याठिकाणी टवाळखोरांनी दोन युवकांना विनाकारण मारहाण केली. त्यावेळी एका जागरुक नागरिकाने त्या युवकाची टवाळखोरांच्या तावडीतून सुटका केली. त्याचा राग धरून टवाळखोरांनी आणखी साथीदारांना बोलावून त्या जागरुक नागरिकांना मारहाण केली.

त्यावेळी पोलिसात गेलात तर पाहून घेईन, असा धमकीवजा इशाराही दिल्याने त्या जागरुक नागरिकाने पोलिसात जाणे टाळले. अशा स्वरुपाच्या घटना सातत्याने सिडको परिसरात घडत असून सिडकोवासिय दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या गस्ती पथकाने टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मोकळी मैदाने, चौकांमध्ये टवाळखोरांचा असतो ठिय्या

शहराचे माजी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या कार्यकाळात शहरातील उपनगरीय परिसरातील मोकळी मैदाने, चौकांमध्ये विनाकरण बसणाऱ्या टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या टवाळखोरांवर दहशत निर्माण झाली होती. कोरोनाच्या कालावधीनंतर ही कारवाई थंडावली आहे. अलिकडे तर शहरात टवाळखोरांच्या हाती धारदार हत्यारेच दिसू लागली आहेत.

मोकळ्या मैदाने, उद्यानांमध्ये टवाळखोर मद्याच्या पार्ट्या करतात. चौकांमध्ये बसून धिंगाणा घालत असल्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत जाब विचारणाऱ्यांना दमदाटी केली जाते. किरकोळ कारणातून थेट चाकू, चॉपर, कोयत्याने वार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून कठोर व ठोस उपाययोजना न राबविल्यास गंभीर स्वरुपाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.