‘ओ शेठ’ची लढाई थेट पोलिसांत; गाण्याच्या क्रेडिटवरून रंगला श्रेयवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

O sheth

‘ओ शेठ’ची लढाई थेट पोलिसांत; गाण्याच्या क्रेडिटवरून रंगला श्रेयवाद

नाशिक रोड : मराठी रसिकांना गुणगुणायला लावणाऱ्या ‘ओ शेठ’ गाण्याच्या श्रेयवादावरून येथील रहिवासी संध्या केशे आणि पुणे येथील गायक उमेश गवळी यांच्यात श्रेयावादाची लढाई रंगली असून, हा विषय सध्या चर्चेचा ठरतो आहे. ‘ओ शेठ’ हे गाणे जूनपासून हीट होत आहे. गाण्याची निर्मिती होताना दसक येथील रहिवासी संध्या केशे यांनी या गाण्याचे लिखाण केले होते आणि परभणी येथील डीजे स्टार प्रणिकेत खुने यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. हे गाणे पुणे येथील गायक उमेश गवळी यांनी गायले होते. या गाण्याला महाराष्ट्रातल्या रसिकांनी अगदी डोक्यावर घेतले. हळूहळू लोकप्रियता वाढू लागली आणि श्रेयवादावरून लढाई सुरू झाली.


संध्या केशे हिने हे गाणे प्रनिकेत खुने यांच्यामार्फत उमेश गवळी यांच्याकडे गाण्यास पाठवले होते. उमेश आणि संध्यामध्ये याचा कागदोपत्री काहीच करार झाला नव्हता. संगीतबद्ध झालेले गाणे तयार करून गवळी यांनी यू-ट्यूबवर हे गाणे अपलोड केले. त्यानंतर या गाण्याला लाखो लाइक मिळायला लागले. यू-ट्यूबकडून त्यांना मानधनही मिळाले. पंधरा दिवसांपासून या गाण्याच्या श्रेयवादावरून संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगत आहे. संगीतकार अनिकेत घुले यांच्या डीजे प्रनिकेत ऑफिशियल या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड केलेले गाणे गायक उमेश गवळी यांनी यू-ट्यूबला स्ट्राईक (बंद) केले आहे. गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून ही श्रेयवादची लढाई सध्या पोलिसांपर्यंत पोचली आहे. उमेश गवळी यांनी पुणे पोलिसांना यासंबंधी अर्ज देऊन हरकत घेतली आहे. संध्या केशे यांनी गाण्याची कवयित्री मीच आहे. याचे लिखित पुरावे असून, पुरावे जनतेसमोर आणणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात विविध राजकीय पक्ष, गायक संघटना प्राणिकेत खुने व संध्या केशे यांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत.

हेही वाचा: सोयाबीन आलंय भरात, भाव गेले पाताळात; शेतकऱ्यांनो जा वखारीत!


गाणे लिहून मी रजिस्टर केले आहे. व्हॉट्सॲप संभाषणातील पुरावेही आमच्याकडे आहे. पैसा, श्रेयवाद आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उमेश गवळी यांनी पोलिस ठाण्याची पायरी चढली आहे. उमेश गवळी यांनी नाशिकला येऊन सामंजस्याने हा वाद मिटवावा. नाही तर पुढची कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत.
- संध्या केशे, कवयित्री

या गाण्याचे लिखाण संध्या यांचे आहे, मात्र हे गाणे प्रनिकेत, संध्या व मी अशा तिघांनी बनवले आहे. मला बदनाम करण्याचे संध्या यांचे षड्यंत्र असून, त्यांच्याविरुद्ध मी अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. हे केवळ पैशाच्या हव्यासापोटी चालले आहे. या संदर्भात पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.
- उमेश गवळी, गायक, पुणे

हेही वाचा: राजकीय हिश्‍शेदारीच्या भीतीपोटी दडवला ओबीसी इम्पिरिकल डेटा

loading image
go to top