Nashik News : नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादाची किनार! कुंभमेळा बैठकीला उपमुख्यमंत्र्यांची दांडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत बोलाविलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मारली दांडी.
Eknath Shinde and Ajit Pawar
Eknath Shinde and Ajit Pawarsakal
Updated on

नाशिक/मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत बोलाविलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी दांडी मारली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमागे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादाची किनार असल्याची चर्चा रंगली आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये २०२६-२७ या वर्षात कुंभमेळा होणार आहे. अवघ्या २० महिन्यांवर सिंहस्थ येऊन ठेपल्याने राज्य पातळीवर तयारीला वेग आहे. कुंभमेळ्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिखर समितीची बैठक आज बोलविली होती.

मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीला जलसंपदामंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन वगळता अन्य महत्त्वाचे मंत्री गैरहजर असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

महायुती सरकारमध्ये नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद रंगला आहे. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिक दौऱ्यात पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांपासून हा गुंता कायम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी आगामी कुंभमेळ्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रयागराज महाकुंभमेळ्यापेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे भव्यदिव्य आयोजन करण्यासाठी फडणवीस आग्रही आहेत. पण त्यांनी बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी पाठ फिरवली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी दूर

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी १७ जानेवारीला पहिली बैठक झाली होती. मात्र, या दोन्ही बैठकांना नाशिक जिल्ह्यातील तिन्ही मंत्री तसेच लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर आहे.

भाजपचे धक्कातंत्र?

नाशिकचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकचे पालकत्व मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट आग्रही आहे.

पण, कोकाटेंचा एक जुना वाद अचानक पुढे आल्याने ते मागे पडले आहेत. या सर्व घडामोडीत आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने भाजप धक्कातंत्राचा अवलंब करू शकते, अशी राजकीय चर्चा आहे.

डिजिटल कुंभमेळा

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याची सूचना फडणवीस यांनी आज केली. तसेच कुंभमेळा ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास एक पथक पाठविण्यात आले होते. या पथकाने नोंदविलेल्या सूचनांनुसार त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी सुविधांचाआढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com