esakal | प्रभाग सभापती निवडणुक : नाशिकमध्ये भाजपमध्ये नाराजी, काही प्रभागांना झुकते माप
sakal

बोलून बातमी शोधा

bjp flag

नाशिकमध्ये भाजपमध्ये नाराजी; काही प्रभागांना झुकते माप

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा मिळवून प्रथमच स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र, महापौरपदासह स्थायी समिती व अन्य महत्त्वाची पदे प्रभाग एकमध्ये दिले गेल्याने पक्षातील नाराज नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच सोमवारी (ता. १९) होऊ घातलेल्या प्रभाग सभापती निवडणुकीतील उमेदवार निवडीवरून पक्षाचे आजी- माजी आमदार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने तिढा निर्माण झाला आहे. (Dissatisfaction-in-BJP-nashik-political-news-jpd93)

काही प्रभागांना झुकते माप; इतरांवर अन्याय

२०१७ मध्ये झालेल्या मनपाच्या सहाव्या पंचवार्षिकमध्ये पंचवटीतील सहा प्रभागातील चोवीस जागांपैकी एकोणीस जागा एकट्या भाजपने पटकावल्या होत्या. त्यात अनेक प्रभागातील चारही जागा याच पक्षाला देत पंचवटीकरांनी भाजपच्या पारड्यात दणदणीत बहुमत टाकले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या महापौर निवडणुकीत महापौरपदासह स्थायी समिती सभापती पद सलग दुसऱ्या वर्षीही प्रभाग एकलाच मिळाल्याने अन्य प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या निवडणुकांत रंजना भानसी यांच्याबरोबरच अरुण पवारही सलग विजयी होत आले आहेत. याशिवाय अरुण पवार यांच्या पत्नीही या विभागातून विजयी झाल्या होत्या. मात्र, सातत्याने निवडून येऊनही श्री. पवार यांच्याकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर श्री. पवार यांची मनपातील भाजपचे गटनेते म्हणून निवड करून त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. गतवेळी मनसेच्या तिकिटावर व त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, पूनम सोनवणे यांना अद्यापही कोणतेही पद मिळालेले नाही.

आजी- माजी आमदारांत रस्सीखेच

प्रभाग सभापतिपदासाठी येत्या सोमवारी (ता.१९) ऑनलाइन पद्धतीने निवडणुका होत आहेत. पंचवटी प्रभागातून माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपले पूत्र मच्छिंद्र यांच्यासाठी आग्रह धरला आहे. याशिवाय पूनम सोनवणे, रुची कुंभारकर यांनीही अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. विद्यमान महापौर कुलकर्णी यांच्या निवडीच्यावेळी श्री. सानप यांचे समर्थक असलेल्या काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे चिंतेचे वातावरण होते. आता अशा काठावरील नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी श्री. सानप यांनी प्रयत्न सुरू केल्याने भाजपसह विद्यमान आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यापुढील डोकेदुखी वाढली आहे. मात्र, प्रभागात स्पष्ट बहुमत असूनही सोमवारी कोणाला पुढे चाल मिळते व कोण माघार घेणार, याकडे पंचवटीकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

loading image