जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
---
संजय पवारांविरोधात पालकमंत्र्यांच्या पुत्राची उमेदवारी
---
विधानसभेत पवारांनी पालकमंत्र्यांचा केला होता प्रचार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येत आहे. विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्यासह कुटुंबियांनी धरणगाव प्राथमिक कृषी पुरवठा विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील, भाजपच्या गायत्री भगवान पाटील यांनीही उमेदवारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत चेअरमन पवार यांनी पालकमंत्री पाटील यांच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली होती. असे असताना पवार कुटुंबियांविरोधात पालकमंत्री पुत्राची उमेदवारी सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
सहकारात राजकारण नसते हे सोयीस्कर विधान असले, तरी प्रत्यक्षात सहकारातील घडामोडींमागे राजकारणही शिजत असते. विधानसभेला ज्यांच्यासाठी प्रचार केला, त्यांच्याच कुटुंबातील सदस्य जिल्हा बँकेच्या निवडणुकीला प्रतिस्पर्धी उमेदवार झाले आहेत. अशीच लढत धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघात पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या यापूर्वीच्या निवडणुकांनी जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. सहकारातील दोन हात राजकारणातील पुढील रंग ठरवीत आले आहेत.
विधानसभेला प्रचार, ‘जेडीसीसी’त विरोधात
विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी जोरदार प्रचार सभा घेतल्या होत्या. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याविरुद्ध पवारांनी घेतलेली उघड भूमिका ही चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजय पवार, सोनल पवार यांच्याविरुद्ध पालकमंत्री पाटील यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, नुकतेच भाजपावासी झालेले भगवान पाटील यांच्या पत्नी गायत्री पाटील प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. हे तिन्ही उमेदवार राजकीयदृष्ट्या सत्तेतील महायुतीचे घटक आहेत. सोमवारी (ता. २) झालेल्या छाननीवेळी गायत्री पाटील यांनी पवार कुटुंबाच्या उमेदवारीवर हरकत घेत सूचक संकेत पवारांना दिला आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघातून कोण माघार घेईल, हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. पालकमंत्री यांचे पुत्र प्रताप पाटील यांची उमेदवारी आणि भाजपच्या उमेदवाराची हरकत या दोन्ही विषयांमुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.