पान-१ साठी
-------------
दीपोत्सवाच्या आनंदपर्वास आजपासून शुभारंभ
----------------
यंदा आठवडाभर आनंदाला उधाण ः वसुबारसनिमित्त आज गोपूजा
-------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ ः तेजोमय प्रकाशाची उधळण करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीतील अत्यंत उल्हासाचा सण मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला गुरुवार (ता.५) पासून उत्साहात प्रारंभ होत आहे. आश्विन वद्य द्वादशी म्हणजेच ''गोवत्स द्वादशी'' (वसुबारस) साजरी केली जाणार आहे. यानिमित्त गाय आणि तिच्या वासराचे पूजन करण्यासाठी सकाळपासूनच गोशाळा, मंदिरे आणि ग्रामीण भागातील घराघरांमध्ये लगबग बघायला मिळणार आहे.
वसुबारसपासून सुरु होणारा हा उत्सव पुढे भाऊबिजेपर्यंत चालणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.६) धनत्रयोदशी साजरी केली जाईल. या दिवशी विधिवत पद्धतीने आरोग्य देवता धन्वंतरी पूजन केले जाणार आहे. रविवारी (ता. ८) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी लक्ष्मी सोनपावलांनी दाखल होणार आहे. मंगळवारी (ता.१०) दीपावली पाडवा व बलिप्रतिप्रदा असून बुधवारी (ता.११) भाऊबीजनिमित्त बहिण आपल्या लाडक्या भावाला ओवाळेल. विशेष म्हणजे यंदा दीपावली पर्व तब्बल आठवडाभर असल्याने यानिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता असल्याने विविध बाजारपेठाही सजल्या आहेत.
भारतीय कृषी संस्कृतीमध्ये गायीला ''गोमाता'' मानतात, तिचे महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती आणि मानवी जीवनात गाईच्या असणाऱ्या उपकारांची परतफेड आणि तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी महिला आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी उपवास करतात. सवत्स धेनूची (गाय आणि तिचे वासरू) हळद-कुंकू, अक्षता आणि फुलांचा हार घालून पूजा केली जाते, तसेच त्यांना नैवेद्य म्हणून पुरणपोळी, गूळ-शेंगा आणि बाजरीची भाकरी खायला दिली जाते.
शहरीकरणामुळे शहरांमध्ये प्रत्यक्ष दारात गाय उपलब्ध होणे कठीण झाल्याने शहरातील नागरिकांची आणि महिलांची पावले गोशाळांकडे वळत आहेत. अनेक ठिकाणी गोशाळा व्यवस्थापनाने पूजेसाठी विशेष नियोजन केले असून नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने गोपूजन करता यावे यासाठी व्यवस्था केली आहे.
----------
१४-१
खरेदीचा ओघ सुरुच..
दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता.४) बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. आकाशकंदील, मातीचे रंगीबेरंगी दिवे, उटणे, सुगंधी तेल आणि रांगोळीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. या दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
---
दिव्यांनी उजळणार शहर
दीपोत्सवानिमित्त पुढील काही दिवस घराघरांसमोर रांगोळी काढून पणत्या प्रज्वलित केल्या जातील. यामुळे दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण शहर उजळून जाणार आहे. फटाक्यांची आतषबाजी करत व गोडधोड पदार्थांवर ताव मारताना दीपोत्सव साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.
--------------