Diwali Festival 2022 : गोवत्सपूजनाने प्रकाशोत्सवाची हर्षोल्हासात सुरवात

vasubaras Cattle Puja
vasubaras Cattle Pujaesakal

नाशिक : गोवत्सपूजनाने शुक्रवारी (ता. २१) हर्षोल्हासात प्रकाशोत्सवाला सुरवात झाली. वसुबारससाठी स्वच्छतेचा उपक्रम राबवत गोठे स्वच्छ करण्यात आले. लम्पीच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता घेण्यात आली. गोठे स्वच्छतेचा उपक्रम जिल्हा यंत्रणेने हाती घेतला होता. जनावरांच्या आरोग्यासाठी गोठ्यातील डास, कीटक, गोमाशी, गोचीड नियंत्रणासाठी कृमी कीटकांच्या निर्मूलनाचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आठ लाख ४० हजार ३९३ जनावरांचे (९३ टक्के) लसीकरण झाले आहे. (Diwali Festival 2022 Prakashotsav begins with Cow Puja on Vasubaras Nashik Latest Marathi News)

जिल्ह्यातील पशूधनामध्ये गो-वर्गीय आठ लाख ९५ हजार ५०, म्हैस दोन लाख २१ हजार २३४, शेळ्या-मेंढ्या आठ लाख ७० हजार १७ यांचा समावेश आहे. गायींच्या प्रसूतीचा काळ साधारणपणे नारळीपौर्णिमा ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत असतो. या काळात निसर्ग अनुकूल असतो. गावांच्या कुराणांमध्ये गवत वाढलेले आहे. शेतबांधावर मुबलक गवत आहे. नुकत्याच व्यालेल्या गायी सर्व प्रकारचे गवत खाऊन तृप्त होतात. अशा निसर्गदत्त हवामान आणि वातावरणात गायींची दूध उत्पादन क्षमता वाढलेली असते.

गायीचे आयुष्यमान साधारण २२ ते २५ वर्षांपर्यंत असते. या कालखंडात ती दहा ते बारा वेळा प्रसूत होते. शेतीसाठी बैल, दुधासाठी, वंशनिर्मितीसाठी कालवडी मिळतात. एका गायीपासून वर्षभरात कीटकनाशक फवारणीसाठी दोन हजार ८०० ते देन हजार ९०० लिटर गोमूत्र उपलब्ध होते. गोवंशाचे मूल्य, प्रतिवर्षातील शेणखताची किंमत या सगळ्यात कृषी संस्कृतीत गायीचे महत्त्व आहे. धन आणि देवांचा वास, अशा या भावनेने धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गायींचे पूजन केले जाते.

vasubaras Cattle Puja
Diwali Shopping : नवीन वाहने खरेदीसाठी वेटिंग; यंदा 25 ते 30 टक्के वाहन खरेदी वाढली

लोकगीतांची परंपरा

वसुबारसपासून दीपोत्सवाची सुरवात होत असल्याने आजच्या दिवसाला गो-वत्स द्वादशी असे म्हटले जाते. वसू म्हणजे द्रव्य-धन्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी हा दिवस साजरा केला जातो. गायीसह वासरांचे पूजन झाले. गहू-मूग आहारात वापरले नाही. भगिनींनी उपवास करत, बाजरीची भाकरी-गवारीची भाजी खाऊन उपवास सोडला. आदिवासी भागामध्ये वाघबारस म्हणून साजरी झाली. शिवाय छोट्यांनी एकत्र जमून घरोघर जाऊन गोठ्यासमोर दिवा घेऊन गाणे म्हणण्याची परंपरा अजूनही ग्रामीण भागाने जोपासल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

परंपरेतील लोकगीत असे :

दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी,

गायीचे पाडे पितरपाडे, पितरामागे रावस घोडे,

रावसामागे धन्नापूर, धन्नापूरची गोगलगाय,

अर्धा डोंगर चरत जाय,

चरता चरता पापणी महादेवाची गोफणी,

मोरी गाय येली, गेनुबा मोरी गाय येली,

गायीला झाला गोऱ्हा, गेणुबा, गायीला झाला गोऱ्हा

गोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा गेणुबा, गोऱ्हाच्या गळ्यात गेठा

vasubaras Cattle Puja
Nashik : स्थानिक दुकानातून खरेदी करण्याची व्यावसायिकांची ग्राहकांना भावनिक साद

आनंद देणारी नंदिनी गोमाता

सर्व देव मये देवी सर्व देवैर अलंकृते।

मातुरांमय आभिलाषीत सफलं कुरू नंदिनी ।।

क्षिरो दार्णव संभुते सुरसूर नमस्कृते ।

सर्व देवमये मातृ गृहाण अर्ध्य नमोस्तुते ।।

अर्थात, सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते, सर्व देव तुझ्यात निवास करतात म्हणून तू सर्व देवमयी आहेस. सर्व देवांनी तुझा गौरव केला आहे. तेव्हा हे आई तू आमच्या इच्छा पूर्ण कर. क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या देवस्वरूप अशा कामधेनूमाते मी देत असलेल्या (अर्घ्याचा) सत्काराचा तू स्वीकार कर. तुला आमचे अनंत अनंत प्रणाम. अर्थात गायी तुझ्यामुळे माझी मुले तुझ्या दुधावर उत्तम वाढलेली आहेत. त्याचे श्रेय तुलाच जाते. आज माझी शेती, घर-दार तुझ्यामुळे बहरले आहे. तरी यापुढेही माझ्या कुटुंबाचे व समाजाचे रक्षण कर, असे म्हणत घरातील कर्त्या पुरुष अन् गृहलक्ष्मीने पूजन केले. गो-वंशाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

"भारतीय शेतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जगद्‌गुरू शंकराचार्यांसह काही मंडळीनी संपूर्ण देशभर गो-ग्राम यात्रा ही चळवळ उभारली होती. प्रत्येक शेतकऱ्याने गाय सांभाळली पाहिजे. हा विश्वमंगल गो-ग्राम चळवळीचा उद्देश होता. बैल आधारित शेतीची कामे वाढली पाहिजेत. गोमय आणि गोमुत्राचा अधिक वापर करून नापिक जमीन सुपीक केली पाहिजे. आजच्या काळात या उद्देशाचे महत्त्व कायम आहे. आदर्श देशी गोवंश वाढवला पाहिजे."

- रमेश मानकर, गोसेवक, नाशिक

vasubaras Cattle Puja
Diwali Festival 2022 : दिवाळीला मोठ्या उत्‍साहात सुरवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com