Latest Marathi News | NMC कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच दिवाळीची भेट; सानुग्रह अनुदान जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच दिवाळीची भेट; सानुग्रह अनुदान जाहीर

नाशिक : दिवाळीसाठी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बिकट आर्थिक परिस्थितीतूनही मार्ग काढत कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कायम कर्मचाऱ्यांना १५ हजार, तर मानधनावरील कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला असला तरी महासभेचे प्रमुख म्हणून आयुक्तच राहणार असल्याने सानुग्रह अनुदानाच्या रकमेवर शिक्कामोर्तब झाले आहे. १० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. (Diwali gift to NMC employees before Dussehra Grant of grace announced Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Lack of Facilities in Anganwadi : शहरातील 89 अंगणवाड्यांचे छप्पर गायब

महापालिकेकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान दिले जाते. सदर अनुदान देणे बंधनकारक नसले तरी स्थानिक पातळीवर राजकीय दबावामुळे दरवर्षी सानुग्रह अनुदान जाहीर केले जाते. या वर्षी महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्या व्यतिरिक्त प्रशासकीय राजवट असल्याने कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, असे असतानादेखील महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सानुग्रह अनुदानाच्या नस्तीवर स्वाक्षरी केली.

यांना मिळणार सानुग्रह अनुदान

महापालिकेत सहा हजार एकशे वीस कायम कर्मचारी आहेत. त्यांना व अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका व मदतनीस यांना १५००० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मानधनावर ४८९ कर्मचारी असून, त्यांना साडेसात हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. सानुग्रह अनुदानापोटी महापालिकेच्या तिजोरीवर जवळपास नऊ कोटी ८० लाख रुपयांचा बोजा पडेल.

त्याचप्रमाणे याच महिन्यात जवळपास ८०० कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता अदा केला जाईल. वर्ग ‘क’ व ‘ड’ कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपये फेस्टिव्हल ॲडव्हान्सदेखील दिले जाणार आहे. महिनाअखेर दिवाळी असल्याने शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यास नोव्हेंबर महिन्याचे वेतन आगाऊ बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

"आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी कर्मचाऱ्यांचा आनंददेखील महत्त्वाचा आहे. लेखा विभागाच्या नस्तीला मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात मंजुरी देऊन दिवाळीपूर्वी बँक खात्यात रक्कम जमा करू." - डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

हेही वाचा: Bogus Medical Certificate : 5 बनावट प्रमाणपत्रांच्या सत्यता पडताळणीत तथ्य