सोने-चांदी खरेदीला उधाण
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या नाण्यांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सराफ बाजारात सोने- चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग बघायला मिळत आहे तर, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने वा चांदीची वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने रविवारी नागरिकांकडून दागिने, लक्ष्मीची सोन्या-चांदीची नाणी तसेच लक्ष्मी-गणेशमूर्तींची खरेदी करण्यात आली. परंपरागत खरेदी आणि गुंतवणुकीचा मार्ग म्हणून सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.
लक्ष्मीपूजनासाठी चांदीची नाणी, लक्ष्मी- गणेशमूर्ती, पूजेची भांडी, समई, दिवे आणि चांदीच्या ताटांना विशेष मागणी असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये असते. त्यामुळे सोन्याच्या अंगठ्या, कानातले, मंगळसूत्र, चेन आणि लहान वजनाच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. बजेटनुसार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असून, काही ग्राहक गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याची नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या पूजा विधीसाठी चांदीच्या नाण्यांना मोठे महत्त्व आहे. शिवाय दिवाळीनिमित्त नातेवाइकांना भेट देण्यासाठी चांदीच्या आकर्षक वस्तूंना पसंती दिली जाते.
--चौकट
क्षमतेनुसार खरेदीचे नियोजन
सोन्या- चांदीच्या दरातील चढउतार लक्षात घेता अनेक ग्राहक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खरेदीचे नियोजन करीत आहेत. मोठ्या दागिन्यांऐवजी कमी वजनाच्या अंगठ्या, पेंडंट, नाणी आणि छोट्या भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल आहे. काही सराफ व्यावसायिकांनी दागिन्यांच्या मजुरीवर सवलती आणि विविध आकर्षक योजना दिल्या आहेत. येणारा पाडवा, भाऊबीज तसेच लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी अनेक ग्राहकांकडून आधीच दागिन्यांची निवड आणि बुकिंग केली जात आहे. सणानिमित्त कुटुंबासह सराफा दुकानांमध्ये गर्दी होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण असून व्यावसायिकांना दिवाळीच्या हंगामात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.
---------