ॲंकर
गोडधोड फराळानंतर मटणावर ताव
खवय्यांची झुंबड'' सामिष जेवणावळींचा बेत
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.१२ : दिवाळीच्या गोडधोड पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांकडून मिठाईनंतर मटण, चिकनवर ताव मारला जात आहे. दिवाळीच्या सुटीत गावाकडे आलेले अनेकजण गोड जेवण, फराळाला कंटाळून तिखट मसालेदार चिकन, मासे, मटणच्या जेवणाला पसंती देत आहेत. अनेकांनी भाऊबीजेनंतर मळ्याखळ्यासह घराघरांत सामिष जेवणाची तयारी केली आहे.
परिणामी चिकन, मासे, मटण अशा मांसाहारी पदार्थांना मागणी वाढू लागली आहे. दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र आल्याने शहरासह ग्रामीण भागातील विविध हॉटेल व ढाब्यांवरची गर्दी वाढत आहे. सुटीत नात्यागोत्यांचीही गाव परिसरात गर्दी वाढली आहे.
दिवाळीच्या फराळानंतर पाहुण्यांना सामिष भोजनाची जणू कसमादेत पद्धतच आहे. खास करून मटणाचेच बेत आखले जात आहेत. विशेषतः चुलीवरच्या मटणाचा स्वाद घेण्यास सर्वजण आतूर असतात. त्यातही मटणाचा खास खानदेशी मसाला वाटून- घाटून तर्रीदार भाजी बनविण्यासाठी कसमादे भागातील खवय्ये प्रसिद्ध आहेत. मटणासह चिकनला मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिवाळ्यात विशेषतः चिकन, अंडी मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. त्यात दिवाळीनंतरच्या पाहुणचाराची जोड मिळाल्याने उलाढाल वाढली आहे. शहर परिसरातील कंदुरी, रायबा, गोंधळ या खास हॉटेलला पर्वणी असते.
गोंधळ व दिवट्या बुधल्या
एकादशी नंतर लवकरच लग्नसराई सुरू होत असल्याने लग्नानिमित्त गोंधळ, दिवट्या बुधल्या अशा कार्यक्रमांचीही रेलचेल वाढणार आहे. चंदनपुरी, भाक्षी या ठिकाणी खंडेराव महाराजांच्या साक्षीने तर अनेक जण स्वतःच्या मळ्यात, घरी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन करतात. एकीकडे लग्नापेक्षा ‘गोंधळ- दिवट्यां’च्या कार्यक्रमांचे आलेले निमंत्रण मात्र न टाळता मंडळी उपस्थित राहते.
चौकट
▪️ मांसाहारी पदार्थ दर
मटण - ८००
चिकन - २४०
गावरान चिकन - ६००
कॉकलर - ४००
मासे - ४००
बोंबिल - १५००
--------------
शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावर पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व कोंबडी पालन करतात. जंगल व रान परिसरात शेळी चराई करतात. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचे भाव, शेळी चराई, कोंबडीच्या खाद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बोकडचे दरात मात्र फारशी वाढ झाली नाही.
- रवींद्र अहिरे, शेळी- कोंबडी पालक
------------
बोकडाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. थंडीचा काळ सुरू होईल त्यामुळे मटणाचा बाजार तेजीत येऊन मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मटणाचे दर नियमित चार महिन्यापूर्वी वाढले आहेत.महागलेल्या चाऱ्यामुळे बोकडाचे बाजारभाव वाढतात.
- सलिम शेख, मटण विक्रेते, मालेगाव