दिवाळी पर्वाने सराफ बाजाराला झळाळी
दिवाळीच्या मंगल पर्वावर नाशिकच्या सराफ बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा तसेच पुढे येऊ घातलेली लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजार आणि कॉलेज रोड परिसरातील सुवर्ण पेढ्यांवर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मात्र, यंदाच्या सणावर सोन्या-चांदीचे वाढलेले भाव आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचे सावट स्पष्टपणे जाणवत आहे.
- दीपिका वाघ
दसरा सणापासून सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरू होते. यातच महिन्याभरात दहा हजारांनी सोने कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. दहा ग्रॅम सोने १ लाख ३८ हजार असणारे मागील काही दिवसात दराच्या चढउतारामुळे सध्या १ लाख ४५ हजारपर्यंत पाेहचले आहे. त्यातच पुढील काळात भाव वाढण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यासह लगतच्या धुळे व जळगाव भागांतील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर यंदाच्या पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सावट पसरले आहे. शेतीमालाला अपेक्षित भाव नसल्याने ग्रामीण भागातून होणारी पारंपरिक खरेदी यंदा काहीशी मंदावली आहे. मात्र, नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून सणानिमित्त चोख खरेदी केली जात आहे.
--------
कमी वजनाचे दागिने व नाण्यांचा ट्रेंड
बजेट कमी असल्यास सोन्यासारखे दिसणारे पण कमी वजनाचे १४ ते १८ कॅरेटमधील दागिन्यांना तरुणींकडून चेनमधील नाजूक डिझाईन, ब्रेसलेट, कानातल्या डिझाइनर रिंगा, स्टोनच्या अंगठ्या, ब्रेसलेट खरेदी केले जात आहे. तुलनेने मागणी कमी असली तरी, त्वचेची ॲलर्जी असल्यास, सोन्यासारखा लुक हवा असल्यास या दागिन्यांना पसंती दिली जाते. तसेच, भविष्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून २ ग्रॅम, ५ ग्रॅम व १० ग्रॅममध्ये चोख सोने आणि चांदीची नाणी, पूजेच्या वस्तूंमध्ये गणपती-लक्ष्मीच्या मूर्ती, समयी खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीय ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
व्यावसायिकांकडून खास सवलती
सणाच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाशिकच्या स्थानिक सराफ व्यापाऱ्यांनी घडणावळीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत, लकी ड्रॉ आणि शून्य टक्के व्याजदराचे सुलभ हप्ते अशा विविध सवलती जाहीर केल्या आहेत. दरांमध्ये वाढ झालेली असली, तरी सणाच्या परंपरेपोटी नागरिक आपल्या क्षमतेनुसार थोडी तरी खरेदी करत असल्याने नाशिकचा सराफ बाजार हळूहळू तेजीत येत असल्याचे चित्र आहे.
दसरा, दिवाळी आणि येणाऱ्या लग्नसराईला २२ आणि २४ कॅरेट सोन्याला कायम मागणी असते. दिवाळीनिमित्त प्रत्येक प्रकारच्या दागिन्याच्या घडणावळीवर विशेष सवलत दिली जाते.
मयूर शहाणे, सराफ व्यावसायिक
----