फोटो : H34820
मुंबई व पुणे मार्गावर प्रवाशांची तुफान गर्दी
मराठवाडा, खानदेशच्या गाड्या तुडुंब; परप्रांतीयांची गावाकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे केल्यानंतर उर्वरित दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी चाकरमानी त्यांच्या मुळ गावाकडे निघाले आहेत. यामुळे शहरातील बसस्थानके गजबजली आहेत. रेल्वेस्थानक ही गर्दीने फुलून गेले आहे. ठक्कर बाजार, महामार्ग तसेच नवीन मेळा बसस्थानक गर्दीने फुलून गेले. जिल्ह्यातंर्गत पेठ- कळवण, सुरगाणा तसेच मालेगावकडे जाणाऱ्या बसगाड्या भरून जात होत्या. या व्यतिरिक्त मुंबई व पुणे मार्गावर तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापुर, सुरत, अहमदाबाद, इंदूरला आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे.
परजिल्ह्यात विशेष करून धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाड्याकडे धावणाऱ्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने काही मार्गांवर विशेष फेऱ्यांचे नियोजन केले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरही दिवसभर प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली. धुळे- जळगावसोबत मराठवाड्याकडील रेल्वेगाड्यांना गर्दी होती. रोजगारासाठी महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले परप्रांतियांनी देखील गावाकडची वाट धरली. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशसह दिल्ली व पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या भरभरून जात होत्या. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वेने बिहार व उत्तर प्रदेशासाठी विशेष रेल्वे सोडल्या आहेत. मात्र, या रेल्वेगाड्यांचे तिकीट मिळवतानाही प्रवाशांची दमछाक होत आहे. रेल्वे तसेच बसगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेत बहुतांश प्रवाशांची पावले खासगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर, नागपुर, अमरावती या मार्गावरील ट्रॅव्हल्स्ला प्रवाशांची पसंती मिळत असल्याने अवघ्या काही तासात बस हाऊसफुल्ल होत आहेत.
---चौकट
विमानसेवेला प्राधान्य
नाशिककरांनी यंदाच्या दिवाळीमध्ये देशाअंतर्गत पर्यटनाला प्राधान्य देताना खास विमानप्रवासाचा बेत आखला आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीच्या सकाळ व रात्रीची सेवा तसेच हैदराबाद, बंगळुरू व अहमदाबाद या सेवांना पसंती मिळते आहे. विशेषतः विमानाने अवघ्या तासात नवी दिल्ली गाठताना तेथून कनेक्टेड फ्लाईटने जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि उत्तराखंडला जाण्याचे प्लॅनिंग नाशिककरांनी केले आहे.
------------------