esakal | कोरोनाच्या निगेटिव्ह पोस्ट नकोच!मानसोपचारतज्ज्ञ सांगताएत...
sakal

बोलून बातमी शोधा

viral post

कोरोनाच्या निगेटिव्ह पोस्ट नकोच! मानसोपचारतज्ज्ञ सांगताएत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवळा (जि.नाशिक) : अलिकडे ‘हर मुठ्ठी में मोबाईल’ अशी स्थिती असल्याने व कोरोनामुळे घरातच थांबून राहावे लागत असल्याने मोबाईलचा वापर वाढला आहे.कोविडच्या महामारीत अनेक कोरोनाबाधित रुग्ण स्वतःचे विलगीकरण व उपचार करून घेत या रोगावर विजय मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना काही महाभाग मात्र सोशल मीडियावर मनाचे खच्चीकरण करणारे भीतिदायक संदेश टाकून रुग्णांची मानसिकता खराब करत आहेत.

‘हर मुठ्ठी में मोबाईल’

सध्या कोरोना महामारीचे संकट आपल्या जिल्ह्यावर घोंघावत आहे. त्यात अनेकांना त्याचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावर घरी तसेच दवाखान्यात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या साऱ्या रुग्णांकडे स्मार्टफोन असतात. मग तेही व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक व इतर सोशल मीडियावर आलेले संदेश, व्हिडिओ पाहतात. असे सारे माहीत असतानाही काही अतिउत्साही मेंबर श्रद्धांजलीचे फोटो व संदेश, दवाखान्यातील-स्मशानभूमीतील व्हिडिओ, कोरोनाची भयानकता सांगणारे मेसेज व्हॉट्सॲप, फेसबुकवर टाकत भीतिदायक वातावरण निर्माण करताना दिसत आहेत. खरंतर अशा प्रतिकूल परिस्थितीत आधार देणे, बरे होणाऱ्यांचे संदेश, व्हिडिओ दाखवणे, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दाखवणे असे केल्यास सर्वांमधील कोरोनाची भीती कमी होण्यास मदत होईल.

अशा संदेशांना पायबंद घालावा

अशा संदेशांना पायबंद घालावा व सकारात्मक बाबी समाजासमोर आणाव्यात, अशा अपेक्षा ज्येष्ठ सदस्य तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपवरील गटप्रमुखांनी याबाबत सदस्यांचे उद्‌बोधन करावे व असे भीती उत्पन्न करणारे मेसेज टाकू नयेत, अशी मागणी होत आहे.कोरोनाची भीती कमी झाली, तर प्रत्येकजण कोरोना चाचणी करून घेईल. स्वतःहून उपचार घेईल. त्यामुळे सध्याच्या घडीला एकमेकांना भावनिक आधार मिळण्यासाठी मनात भीती निर्माण होतील, असे मेसेज पोस्ट करू नयेत, असे सूचित केले जात आहे.

मन आणि शरीर यांचा अत्यंत जवळचा संबंध असल्याने प्रत्येकाची मनःस्थिती सुदृढ व निरोगी असणे महत्त्वाचे असते. मनात भीती निर्माण झाल्यास नकारात्मक विचार येतात, प्रतिकारशक्ती कमी होते. असह्य वाटते. म्हणून रुग्णांना नेहमी प्रेरक, आशादायी गोष्टी सांगितल्या जाव्यात. - उमेश नागापूरकर, मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक

मोबाईलवर मनोरंजनात्मक गाणी, खेळ, कोडी, विनोद, व्यावसायिक मार्गदर्शन, प्रेरणादायी कथा अशा सकारात्मक बाबी शेअर कराव्यात. भीती पसरवणारे मेसेज टाळावेत. - डॉ. प्रशांत निकम, देवळा