esakal | डॉक्‍टरांना अपेक्षा मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिव्‍हिरची

बोलून बातमी शोधा

Oxygen
डॉक्‍टरांना अपेक्षा मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिव्‍हिरची
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपासून ऑक्सिजन उपलब्‍धतेसाठी वैद्यकीय यंत्रणेसह डॉक्‍टरांची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेच्‍या पदाधिकाऱ्यांसह शहरातील डॉक्‍टरांची शनिवारी (ता.२४) बैठक झाली. आठ दिवस सुरळीत व अखंडित पुरेल इतका ऑक्सिजन उपलब्‍ध करण्यासह अन्‍य बाबींवर चर्चा झाली.

बैठकीस आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, सचिव डॉ. कविता गाडेकर, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. विशाल पवार, राज्‍य ‘आयएमए’च्‍या कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी, नाशिक रोड ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. शीतल जाधव आदी उपस्‍थित होते. रुग्‍णालयात दाखल रुग्‍णाला रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ऑक्सिजन मिळेल की नाही, अशी निश्‍चितता नको. सरकारी आणि खासगी रुग्‍णालयांना सारखेच महत्त्व द्यावे, अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ४६ बळी; पाच हजार ३४ रुग्ण बरे

बैठकीनंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेत डॉ. सोननीस म्‍हणाले, की शासनाच्‍या सूचनांप्रमाणे आम्‍ही डॉक्‍टरांना ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्यासंदर्भात सूचना दिल्‍या आहेत. अत्‍यावस्‍थ रुग्‍णांना काळजीपूर्वक ऑक्सिजन वापरत शक्‍य तितकी बचत केली जात आहे. कोरोनारूपी युद्धात आम्‍ही लढत राहणार आहोत. शासनाच्‍या पाठबळाची आवश्‍यकता असल्‍याचे नमूद केले.

डॉ. राजेंद्र कुलकर्णी म्‍हणाले, की डॉक्‍टर रुग्‍णांच्‍या उपचारासाठी शर्तीचे प्रयत्‍न करीत आहेत. त्यातच ऑक्सिजन व रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनची मुबलक उपलब्‍धता होणे आवश्‍यक आहे. ऑक्सिजनच नसेल, तर रुग्‍ण दाखल करून घेण्यावर मर्यादा येतील. यामुळे रुग्‍णाचे नातेवाईक व रुग्‍णालये यांच्‍यातील संघर्ष वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य ओळखून प्राधान्‍यक्रमाने प्रश्‍न सोडवावेत.

बैठकीस माध्यम प्रतिनिधींना मज्‍जाव

डॉक्‍टरांचे नेमके प्रश्‍न काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी बैठकीस जाऊन बसले. काही वेळ बैठकीस बसून प्रतिनिधी प्रश्‍न समजून घेत होते. परंतु पदाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी प्रतिनिधींना बाहेर जाण्यास सांगितले. त्‍यामुळे डॉक्‍टरांच्‍या समस्‍या व प्रश्‍नांव्यतिरिक्‍त बैठकीत असे काय गोपनीय होते, असा प्रश्‍न उपस्‍थित होत होता.