esakal | मुलाला वाचविण्यासाठी ज्यूलीची नागाशी झुंज! स्वतःचा जीव देऊन केली राखण

बोलून बातमी शोधा

dog gave his life to save the boy from the cobra
मुलाला वाचविण्यासाठी ज्यूलीची नागाशी झुंज! स्वतःचा जीव देऊन केली राखण
sakal_logo
By
- दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : कुत्रा हा माणसाचा सर्वांत प्रामाणिक मित्र असतो, असे बोलले जाते. याचाच प्रत्यय मोराणे सांडस येथे नुकताच आला. एका कुत्रीने स्वत:चा जीव देऊन विषारी नागापासून मालकाच्या मुलाचे प्राण वाचवले. फणा वर काढलेल्या सापावर कुत्री तुटून पडली आणि त्याचा खातमा केला. यादरम्यान सापाने कुत्रीला अनेकदा दंश केला, यातच तिचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांकडून तीन दिवस दुखवटा

‘तेरी मेहरबानियाँ’ या हिंदी चित्रपटात ज्याप्रकारे एका कुत्रीने मालकाप्रति जीव ओवाळून टाकणारे दृश्य दाखविले आहे. याची खरी प्रचीती मोराणे सांडस (ता. बागलाण) येथे पाहायला मिळाली. येथील सचिन मोकासरे यांनी नाशिक येथून ३० ते ४० दिवसांचे रॉट व्हिलर जातीचे कुत्र्याचे पिलू आणले होते. त्याची प्रकृती नाजूक होती. मोकासरे यांनी औषधोपचार करून पूर्ण काळजी घेत घरातील सदस्यांप्रमाणे त्याला वागणूक दिली. ‘ज्यूली’ असे तिचे नामकरण करण्यात आले. कुटुंबीयांसमवेत चार वर्षांपासून ज्यूली मिसळून राहत होती. दोन दिवसांपूर्वी घरातील लहान मुलांसमवेत ज्यूली अंगणात खेळत असतानाच काटेरी झुडपात आवाज ऐकताच मुलांच्या दिशेने येणाऱ्या नागावर तिची नजर पडली. नाग तिच्यासमोर फणा उभारून दंश करण्याच्या स्थितीत होता. याचदरम्यान ज्यूली नागावर तुटून पडली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये झटापट झाली. ज्यूलीने नागाला ठार केले. परंतु यादरम्यान कोब्रानेदेखील ज्यूलीला दंश केला होता. सचिन मोकासरे यांना कुणकुण लागताच त्यांनी कुटुंबासह धाव घेतली. ज्यूलीला अनेक ठिकणी कोब्राने दंश केले होते. कुटुंबीयांनी ज्यूलीला वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. मात्र अपयश आले. कुटुंबातील जणू एक सदस्यच गेल्याची भावना व्यक्त करत ज्यूलीचे जड अंतःकरणाने दफन केले.

ज्यूली अतिशय खेळकर असल्याने लहान मुलांसमवेत खेळायची. अंगणात असेच खेळत असतानाच काटेरी झुडपात तिला काहीतरी असल्याचे जाणवले. मुलांच्या दिशेने येणारा विषारी नाग दिसताच त्याच्यावर ती तुटून पडली. झटापटीत नाग ठार झाला. मात्र ज्यूलीला दंश केल्यामुळे काही तासातच तिने प्राण सोडले. आम्ही तीन दिवस दुखवटा पाळला आहे. आजही ज्यूली घराबाहेर खेळत असल्याचा अभास आम्हाला होतो.

- सचिन मोकासरे, ज्यूलीचे मालक, मोराणे सांडस

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी