esakal | येवल्यात ४६ हजार कुटुंबाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण! ३२२ पथकाचे काम सुरू

बोलून बातमी शोधा

Yeola

येवल्यात ४६ हजार कुटुंबाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण! ३२२ पथकाचे काम सुरू

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचा कहर सुरूच असल्याने प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाचा वाढलेला प्रसार रोखण्याण्यासाठी आता गावोगावी कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार असून, यासाठी ३२२ पथके तैनात करण्यात आली आहे. तब्बल ४६ हजार ३२९ कुटुंबांचे याद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.

दुसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण निघत आहे. ३० हुनअधिक गावे हॉटस्पॉट झालीच पण काही गावात मृतांची संख्या दहा ते पंधरा वर गेल्याने चिंता वाढली आहे. आजही शहरात केवळ तीन तर ग्रामीण भागात २५८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यावरून तफावत लक्षात येते. आतापर्यंत शहरातील १ हजार १६९ तर ग्रामीण भागातील २ हजार ६२४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत व्यापक सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, २ मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. यासाठी १२४ गावांमध्ये ३२२ पथकातील ९८६ सदस्य घरोघरी जाऊन सुमारे ४६ हजार ३२९ कुटुंबाचे सर्वेक्षण करणार आहेत. प्रत्येक व्यक्तीचे ऑक्सिजन व ताप मोजमाप केले जाणार असून, कोमार्बिड व्यक्तींची चाचणी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येईल, तसेच संशयित रुग्णांवरही तत्काळ तपासणी करून उपचार केले जाणार आहे. तालुक्यातील विविध शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा या पथकामध्ये समावेश आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

सद्यस्थितीत ग्रामीण भागात पॉझिटिव्ह आहेत पण लक्षणे नाहीत अशी स्थिती असल्याने त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याची शक्यता आहे. शिवाय ग्रामीण भागातील अनेक जण तपासणी व उपचाराकडेही दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे घरोघर होणाऱ्या सर्वेक्षणातून संशयित रुग्ण पुढे येणार असून, त्याद्वारे वेळेत तपासणी व उपचार झाल्यास त्यांच्या माध्यमातून होणारा स्प्रेड रोखला जाऊ शकेल, असा आशावाद आहे. या मोहिमेअंतर्गत आज तहसीलदार प्रमोद हिले यांनी चिचोंडी, एरंडगाव बुद्रुक येथे भेट देऊन सर्वेक्षणाची माहिती घेत पथकाला मार्गदर्शन केले. या वेळी शिक्षक जालिंदर गावडे, कविता पडोळ, अंगणवाडी सेविका छायाबाई गोसावी, योगेश वराडे, कमलेश निर्मळ आदी उपस्थित होते.

रिकव्हरी रेट वाढला…

आतापर्यंत एकूण ३ हजार ७९३ रुग्णांपैकी ३ हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामध्ये शहरातील १ हजार ११९ तर ग्रामीण भागातील २ हजार २५४ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात रुग्ण रिकव्हरी रेट ८२ टक्के होता. तो आता ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही समाधानाची बाब मानली जात आहे. शिवाय आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण एका वेळेस ॲक्टिव्ह राहत होते. हाच आकडा आता घटला असून, २६१ वर आला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे! रुग्णांसाठी स्वत:ची कार केली रुग्णवाहिका

एक नजर आजपर्यंतच्या आकडेवारीवर...

*एकूण रुग्ण - ३७९३

*बरे झालेले - ३३७३

*एकूण मृत्यू - १५९

*आजचे ॲक्टिव्ह - २६१

*कंटेंटमेन्ट झोन - ९८७

*नागरिकांचा सर्वे - ८६५०४

*घेतलेले स्वब -

-रॅपिड अँटिजिन - १०२७४

- पीसीआर - ६५५२

*एकूण पॉझिटिव्ह -

-रॅपिड अँटिजिन - २७१८

- पीसीआर - ९५५

*बरे होण्याचे प्रमाण - ८८.९२ टक्के

*मृत प्रमाण - ४.१९ टक्के