Latest Marathi News | Nashik : डाऊनी’ कोबीच्या मुळावर देवळ्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cabbage

Nashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली

देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यात कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी तिहेरी संकटात सापडला आहे. (Downy Cabbage variety has raised farmers' concern Nashik)

येथील कोबी पिकावर सध्या डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या कोबीला १७ ते २१ रुपये किलोने बाजारभाव मिळत असल्याने उत्पादक वर्ग समाधानी असला तरी डाऊनी रोगामुळे उत्पादनात घट येणार आहे. सावकी येथील शेतकरी धनंजय बोरसे यांनी अडीच एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली. यासाठी त्यांनी ३० हजार रुपयांचे बियाणे घेतले.

हेही वाचा: या ब्रॅण्ड्सच्या सामान्य टी-शर्टचीही किंमत आहे लाखोंमध्ये

दोन महिन्यात या पिकावर त्यांनी ६० ते ७० हजार रुपयांची औषधे फवारली. तर निंदणीसाठी वीस हजार रुपये खर्च आला. मात्र, या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास डाऊनी रोगाने हिरावून घेतल्याने त्यांच्या पुढील आशेवर पाणी फिरले आहे. शेतकऱ्यांना वारंवार बसणाऱ्या फटक्यामुळे ते अधिक कर्जबाजारी होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.

''मोठ्या अपेक्षेने आणि मेहनतीने कोबीची लागवड केली. त्यासाठी खर्च आणि दिवसरात्र मेहनत घेतली. भाव बरा असल्याने उत्पादन मिळण्याची आशा असतानाच डाऊनी रोगाने शिरकाव केला. रोगाच्या या अशा वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.''

- संजय सावळे, शेतकरी, विठेवा

हेही वाचा: Belgaum : अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीत घट, शिक्षण खात्याची चिंता वाढली

टॅग्स :NashikFarmerstressagro