
NAFED Onion Purchase | नाफेड मार्फत 950 टन लाल कांदा खरेदी : डॉ. भारती पवार
नाशिक : जिल्ह्यात कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संकटात सापडला. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलने सुरू केली. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून लाल कांदा खरेदी सुरू केली आहे.
सद्यःस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ८ केंद्रांवर कांदा खरेदी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ९५० मेट्रिक टन लाल कांदा खरेदी केल्याची माहिती नाफेडचे व्यवस्थापक सुशीलकुमार यांनी दिली.
जिल्ह्यातील अजून १० केंद्रांवर म्हणजे एकूण १८ केंद्रांवर कांदा खरेदी करण्यात यावा, असे आदेश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाफेड व्यवस्थापनाला दिले आहेत. (Dr Bharti Pawar statement purchase 950 tonnes of red onion through NAFED nashik news)
जिल्ह्यात यंदा ५१ हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. यातून कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरी २५ टन याप्रमाणे जवळपास १२ लाख ७५ हजार टन कांदा उत्पादन झाले आहे.
लाल कांदा हा ढगाळ वातावरणामुळे व त्यात पाण्याचा अंश जास्त प्रमाणात असल्याने जास्त काळ टिकत नाही. परिणामी या कांद्याची खरेदी बफर स्टॅाकसाठी करण्यात येत नाही, असे असताना देखील केवळ शेतकरी संकटात सापडला असल्याचे लक्षात घेऊन डॉ.पवार यांनी केंद्राला नाफेड मार्फत कांदा खरेदी करायला आग्रह धरला होता.
या मागणीची तत्काळ दखल घेऊन, वाणिज्य मंत्रालयाने दोन आठवडे अभ्यास केला. त्यावर, नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला. नाफेड मार्फत कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी सुरू झाल्याने कांद्याला योग्य तो हमीभाव मिळणार असून शेतकऱ्यांनी कांदा नाफेडच्या अधिकृत केंद्रावर लिलाव करावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.
सद्यःस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ८ केंद्रावर कांदा खरेदी सुरु करण्यात आली असून अधिक १० केंद्रावर म्हणजेच १८ केंद्रावर कांदा खरेदी करण्यात यावी, असे आदेश यावेळी डॉ. पवार यांनी नाफेड व्यवस्थापनाला दिले आहेत.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
महाराष्ट्र राज्यासह शेजारील गुजरात, मध्यप्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आल्याने महाराष्ट्रातील कांद्याला बाहेरील राज्यात मागणी नसल्याने कांद्यांचे दर कोसळले आहेत. तसेच कांदा निर्यात सुरू असून बाहेरील देशांची आर्थिक परिस्थिती नसल्याने कांद्याची मागणी कमी प्रमाणात होत आहे.
नाफेडमार्फत मटाणे, कळवण, विंचूर, वणी या ठिकाणी प्रत्येकी एक तर देवळा आणि पिंपळगाव बसवंत या ठिकाणी प्रत्येकी दोन ठिकाणी केंद्रे उभारण्यात आली असून येथे कांदा खरेदी प्रक्रीया पार पडत आहे. या ठिकाणी कांद्याला गुणवत्तेनुसार भाव मिळत आहे. सरासरी हा भाव ९०१ रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती समोर आली आहे.