Nashik News : मुख्याध्यापकांच्या विरोधात विद्यार्थिनींचा पायी मोर्चा; प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कार्यमुक्तीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

March

Nashik News : मुख्याध्यापकांच्या विरोधात विद्यार्थिनींचा पायी मोर्चा; प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कार्यमुक्तीचे आदेश

कळवण (जि. नाशिक) : कनाशी येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका यांच्या मनमानी कारभाराला त्रासलेल्या २५० विद्यार्थिनींनी कनाशी ते प्रकल्प कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत कळवण प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थिनी लोकप्रतिनिधी, पालक यांनी तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर याची दखल घेत प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

दरम्यान प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे हे कनाशी येथे आश्रमशाळेला भेट देऊन मुलींशी संवाद साधणार आहे. (Female students march on foot against principal Discharge orders from Project Officers Nashik News)

कळवण तालुक्यातील कनाशी येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका अर्चना जगताप या आश्रमशाळेतील मुलींशी व पालकांशी अर्वाच्य भाषेत बोलून अपमानास्पद व सापत्न वागणूक देत मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांची बदली करा या प्रमुख मागणीसाठी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी कनाशी आश्रमशाळा ते कोल्हापूर फाट्यावरील प्रकल्पधिकारी कार्यालयाच्या दालनापर्यंत पायी मोर्चा काढून एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.

प्रकल्पधिकारी नरवाडे यांच्याशी बोलणार या भूमिकेवर विद्यार्थिनी ठाम राहिल्याने दिल्ली येथे शासकीय कामकाजनिमित्ताने गेलेल्या नरवाडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थिनी आपली गाऱ्हाणे मांडत तक्रारीचा पाढा वाचला.

कनाशी येथील शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या मुलींची असताना देखील विषय शिक्षक शाळेत नाही. आश्रमशाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत नसून गणित विषयाला शिक्षक नसल्याने मुलींचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार मुलींनी केली.

तर काही मुलींना जातिवाचक बोलत असल्याचा आरोपही जयपूरचे सरपंच सुनील गायकवाड यांनी केला. विद्यार्थीनींना वेळेवर जेवण मिळत नसल्याची तक्रारही विद्यार्थिनींनी केली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मुख्याध्यापिका श्रीमती. जगताप आल्यापासून वादग्रस्त ठरल्या असून पालकांना दमबाजी करतात, अपमानास्पद बोलत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. यावेळी आदिवासी सेवक डी.एम.गायकवाड यांनी तक्रारी केल्या.

याप्रसंगी तहसीलदार बी.ए.कापसे, पोलिस उपअधीक्षक श्री. फडतरे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, अभोणा पोलिस स्टेशन निरीक्षक श्री. शिंदे आदिवासी विकास विभागाचे तुषार पाटील, पंकज बुरकूल, प्रशांत कोर आदींसह पालक व नागरिक उपस्थित होते.

बदलीची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी मोर्चास्थळी भेट देऊन मुलींच्या व पालकांच्या समस्या जाणून घेत प्रकल्पधिकारी नरवाडे यांच्याशी संवाद साधत कनाशी आश्रमशाळेतील तक्रारीचा पाडा वाचला.

मनमानी कारभार आणि मुलीशी व पालकांशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या मुख्याध्यापिका व कर्मचाऱ्यांची तालुक्यातून बदली करण्याची व मोर्चा काढणाऱ्या मुलींना संरक्षण देण्याची मागणी केली. कळवण : प्रकल्प कार्यालय ठिय्या आंदोलन करताना विद्यार्थिनींनी तर दुसऱ्या छायाचित्रात पायी मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

टॅग्स :Nashikstudent