शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित गोरक्षकांवर कारवाई करणार

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित गोरक्षकांवर कारवाई करणार
Published on: 
CHE26B18101, CHE26B18099 नाशिक रोड : पत्रकार परिषदेत शुक्रवारी बोलताना विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे डॉ. प्रवीण तोगडिया. शेजारी नगरसेवक कैलास मुदलियार, शिवसेना नेते विजय करंजकर, नितीन चिडे आदी. (छायाचित्र अंबादास शिंदे) शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित गोरक्षकांवर कारवाई करणार डॉ. तोगडिया यांचा इशारा; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १० हजार डॉक्टर देण्याची तयारी सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. १३ : गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची वाहने अडविणे, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणे आणि आर्थिक शोषण करणे, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारांना बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आरोग्यसेवेसाठी गरज भासल्यास १० हजार डॉक्टर उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. नाशिक दौऱ्यात शुक्रवारी (ता. १३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी नगरसेवक कैलास मुदलियार, शिवसेना नेते विजय करंजकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जनावरे विक्रीस काढत आहेत. मात्र, काही कथित गोरक्षक वाहने अडवून जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा आरोप करतात. पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणण्याबरोबरच आर्थिक शोषणही केले जात असल्याच्या तक्रारी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यावर, गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देणे चुकीचे असून, अशा प्रकारांत सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार करावी, असे तोगडिया यांनी स्पष्ट केले. सिंहस्थासाठी आरोग्यसेवेवर भर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत दहापट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि अफवा रोखण्याला प्राधान्य द्यावे लागेल. भाविकांना कमीत कमी चालावे लागेल, अशा पद्धतीने व्यवस्था केल्यास गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यात आरोग्यसेवेसह अन्नदानासाठीही योगदान देण्याची इच्छा असून, आवश्यकतेनुसार १० हजार डॉक्टर उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. हनुमान चालिसा केंद्रांचे आरोग्य केंद्रांत रूपांतर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या माध्यमातून देशातील लाखो गावांमध्ये हनुमान चालिसा पठण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांचे आरोग्य केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू असून, सुमारे २५ कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १० हजार डॉक्टर या अभियानाशी जोडले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हाडांचे विकार आणि कर्करोग यांसारख्या आजारांवर वेळेत तपासणी व उपचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदतीची गरज शेतकरी आत्महत्या ही समाजासाठी शरमेची बाब असल्याचे सांगत तोगडिया यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातून चारा खरेदी करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. पाच हजार रुपयांच्या मदतीऐवजी शक्य तितकी अधिक आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या माध्यमातून एक कोटी गरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय संबंधांबाबत बोलताना निवडणुकीपुरते पक्ष महत्त्वाचे असतात; अन्य वेळी हिंदू म्हणून परस्परांशी संबंध महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांशी आपले संबंध असल्याचे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयीही त्यांनी भाष्य केले. त्रिशूळ वाटपाची जबाबदारी माझीच! लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तरुणांनी समाजातील प्रश्नांसाठी आवाज उठवावा; मात्र आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. त्रिशूळ वाटपाची जबाबदारी स्वतःचीच असल्याचे स्पष्ट करीत देवीचे शस्त्र म्हणून त्रिशूळ वाटप केल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह आणि महाराणा प्रताप हे आपले आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.