दुष्काळ निवारणसह
वनहक्कासाठी आज मोर्चा
--
शेतकरी, आदिवासींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक सभेचा एल्गार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे पिके जळून खाक झाली असून, शेतकरी व आदिवासी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारण, मतदारयादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेचा विरोध आणि आदिवासी वनहक्क कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा (महाराष्ट्र) आणि किसान महासभा, संयुक्त किसान मोर्चा (दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २३) दुपारी बाराला साक्री (जि. धुळे), नवापूर (जि. नंदुरबार), कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर), सटाणा (जि. नाशिक) येथील तहसील कार्यालय, तर नंदुरबार व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले यांनी दिली.
ऑगस्टनंतर पाऊस न झाल्याने सोयाबीन, भात, कापूस व तूर जळाली आहे. शासनाने ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून पाच हजारांची मदत देण्यापलीकडे ठोस उपाययोजना केलेली नाही. प्रशासनाने वेळकाढू पंचनाम्यांऐवजी सरसकट सर्व शेतकऱ्यांना आणि २०२० पूर्वीच्या वनहक्क दावेदारांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. भूमिहीन शेतमजूर व कष्टकऱ्यांना पुढील वर्षभर दरमहा पाच हजार रुपये जीवन अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी आहे. या मोर्चात हजारो शेतकरी व कष्टकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.