फोटो ओळी- 11149
नांदगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत बोलताना आमदार सुहास कांदे. शेजारी नगराध्यक्ष सागर हिरे आदी.
शेतकऱ्यांना हक्काची मदत मिळवून द्या
आमदार सुहास कांदे ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्याकडून सलग दुसऱ्यांदा आढावा
नांदगाव, ता. ९ : नांदगाव मतदारसंघात भीषण दुष्काळी परिस्थिती असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पीकपाहणी, नुकसानीचे पंचनामे आणि पीकविम्याच्या सर्वेक्षणात कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करू नका. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी काम करा, अशा सूचना आमदार सुहास कांदे यांनी शुक्रवारी (ता. ९) दिल्या. गावगाड्याच्या पातळीवर काम करताना अडचणी आल्यास थेट आपल्याशी बोलावे. आमचे शिवसैनिक आपल्याला याकामी सहकार्य करतील, असा धीर त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.
सद्यःस्थितीत सुरू असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्याकडून सलग आढावा बैठक सुरू असून, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी फिल्डवर काम करणाऱ्या तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक व पीकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत आमदार कांदे यांनी विचारविनिमय केला व दुष्काळात आपल्या भागातील शेतकऱ्यांची सामान्य नागरिकांची होरपळ होणार नाही, यासाठी यंत्रणेचा घटक म्हणून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यासोबत गांभीर्याने काम करण्याच्या सूचना केल्या. नगराध्यक्ष सागर हिरे, तहसीलदार सुनील सैंदाणे, गटविकास अधिकारी श्रीकिसन खातळे आदी उपस्थित होते.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कर्जाचे हप्ते, आजारपणावरील उपचार आणि इतर कौटुंबिक खर्चांचे प्रश्न आहेत. अशा वेळी त्यांना मिळणारी मदत वेळेत त्यांच्या खात्यात जमा होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये टाळाटाळ करू नका, पीकपाहणी करताना शेतकऱ्यांना अडवू नका आणि अडचणी निर्माण करण्याऐवजी त्यातून मार्ग काढा, असे कांदे यांनी स्पष्ट केले. पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना करताना त्यांनी सर्वेक्षण करताना शेतकऱ्यांना अनावश्यकपणे नियमांच्या कचाट्यात अडकवू नका. प्रत्यक्ष पीक नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वेक्षण करा. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मिळणारा आधार महत्त्वाचा आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहनही आमदार कांदे यांनी केले.