
Youth in Addiction : पिंपळगावची तरुणाई व्यसनांच्या विळख्यात! पालकांना सतावतेय चिंता
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : (Drug Addiction) गुटखा, तंबाखू, सिगारेट, गांजा, मद्यपानाचा सर्वच वयातील व्यक्तींना विळखा पडला आहे. परंतु यात १७ ते ३० वयोगटातील मुले अधिक प्रमाणात आहारी जात असल्याचे पिंपळगाव बसवंतमध्ये दिसत आहे.
काही वर्षांपासून या मुलांना कुठल्या ना कुठल्या नशेची सवय जडली असल्याचे मद्य व सिगारेटच्या वाढत्या विक्रीची आकडेवारी व आकडेवारीतून दिसत आहे. मुलांच्या नशेमुळे पालकांच्याही जीवाला घोर लागला असून, पिंपळगाव शहरातील अंदाजे २० टक्के मुले नशेच्या विळख्यात अडकली आहेत.
मद्यपान व गांजा ओढून नशेच्या धुंदीत धूम स्टाइल वाहने चालविताना होणाऱ्या अपघातामुळे अनेक तरुण गंभीर जखमी, तर काही जण जीवाला मुकत आहे. (Drug Addiction youth of Pimpalgaon drug addiction Parents worried nashik news)
मद्यपान, सिगारेट, गांजासह वेगवेगळ्या नशा करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. १७ ते ३० वयोगटातील मुलांची संख्या दहा हजार आहे. सम्राट अन् बेफाम होणारी या वयातील तरूणीई व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे.
पिंपळगाव शहरातील आर्थिक सुबत्ताही या युवावर्गाला नशेची लत लावत आहे. साथसंगतीतून हे तरुण विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. एकटा मुलगा आहे, त्याचे लाड पुरवायला हवे, या समजतीतून पालकही हवी तेवढी रक्कम पॉकीट मनीच्या नावाखाली देतात.
त्यातून सिगारेटचे झुरके व बारमध्ये पेग भरताना तरुणाई दिसत आहे. कुणी गरिबीतून तर मोठ्या घरातील आसामी म्हणून अघोरी चंगळवाद करीत आहे. तर काही राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टीच्या नावाखाली तरुणाईला बिघडवत आहेत.
व्यसनाचे प्रकार
व्हाइटनर, वाहनाचे टायर पंक्चर दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे सोल्यूशन, कोरेक्स सिरप, सिगारेट, विडी, गुटखा व दारूचे व्यसन असलेल्यांचा समावेश आहे. ही नशा करण्यासाठी तरुणांनी काही अड्डे बनविले आहेत. सायंकाळी एकत्र येऊन व्यसन केले जाते. नशेतून काही तरुण गुन्हेगारीकडेही वळल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे.
"कोणतीही नशा ही विनाशाकडेच घेऊन जाते. आर्थिक व शारीरिक हानी करते. व्यसनात गुरफटलेली तरुणाई ही चिंतेची बाब आहे, त्यासाठी पालकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला सुधारण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र हा प्रभावी उपाय आहे." -प्रा. पी. आर. मोरे