esakal | कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

 marriages in rural area does not match

कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : गेल्या वर्षीच आमच्या राजूच्या लग्नाचा बार उडवायचा होता, पण कोरोना आला अन्‌ त्याची नोकरी गेली. काही कामधंदा नसल्याने घरीच आहे तो आता. राजूचे लग्न काही जुळेना, यंदा तरी दोनाचे चार हात होतील, असे वाटत होते, पण पुन्हा कोरोनाचा भडका उडाला. अशा व्यथा शिरवाडे वणी (ता. निफाड) येथील निफाडे दांपत्य सांगत होते. असाच काहीसा सूर उपवर मुलांच्या आई-वडिलांकडून ऐकू येत आहे. कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांची लग्न जुळणे कठीण झाले आहे.

कोरोनामुळे आर्थिक परिणाम समाजावर झालाच आहे, पण दोन जीवांच्या रेशीमगाठी जुळण्यालाही त्याने बाधा आणली आहे. पोराला नवरी शोधण्यासाठी पालकांना गावोगावी, पाहुण्यांकडे फिरावे लागत आहे. तरुणांची विवाहगाठ बांधणे ही आता मोठी समस्याच बनली आहे. कोरोनामुळे नोकरी गेल्याने शहरातून परतलेल्या तरुणांची स्थिती बिकट आहे. कोरोनामुळे छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या या तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याचा परिणाम तरुणांच्या लग्नावर झाला आहे.

प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात जावी, अशी अपेक्षा असते. मुलगी व पालक नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती देतात. महिन्याला खात्रीशीर उत्पन्न असा त्यामागील हेतू असतो. टाळेबंदीत अनेक तरुणांच्या हातच्या नोकऱ्याच गेल्याने मुलींकडून नकाराला सामोरे जावे लागते. या समस्येमुळे मुलांसहित पालकांनाही नैराश्‍याचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी शहरातून गावात आलेले काही तरुण पुन्हा शहरात परतले, पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परत नोकरी जाणार का, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. नोकरीच्या अनिश्‍चिततेमुळे बरेच युवक खेड्यातच रमले आहेत. शेती किंवा अन्य व्यवसाय करतात; परंतु नोकरदारच मुलगा हवा, या अटीमुळे तरुणांची लग्ने जुळणे कठीण झाले आहे.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ‘देशप्रेमीं’ची पंचाईत; तंबाखूची पुडी, देशी दारू महागली

शेतकरी नवरा नको गं बाई..!

निफाड तालुका तसा द्राक्षशेतीसह बागायतदारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. पण, द्राक्षाचे बेभरवशाचे उत्पन्न, कारखाने बंद असल्याने उसाची परवड यामुळे बागायतदार ही बिरुदावली आता नावालाच राहिली आहे. पूर्वी निफाडमध्ये मुलगी देणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जायचे. आता मात्र ‘शेतकरी नवरा नको गं बाई..!’ अशी स्थिती आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये अडीच महिन्यांतच वाढले ६७ टक्के बेड, ऑक्सिजन बेडमध्ये दुप्पट वाढ

loading image
go to top