esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Due to heavy rains in Nashik district onion  crop were damaged

महागडे कांदा बियाणे पाण्यात! अतिवष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : गेल्या आठवड्यातील अतिपावसामुळे कांदापिकासह कांदा बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. कांदा पीक व बियाण्यावर करपा पडल्याने कांदे कसे पिकवावेत, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. कांदा रोप खराब होऊ लागल्याने ‘महागडे बियाणे पाण्यात’ गेल्याने मोठा फटका बसला आहे.

येथील कसमादे भाग, चांदवड तालुक्यातही खरीप व रब्बी हंगामाच्या मध्यात रांगडा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा खराब झाला किंवा त्याची टंचाई निर्माण झाली तर हा कांदा चांगले पैसे देवून जातो, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या पूर्वार्धात कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाण्याची पेरणी करत रोपे तयार करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कांद्यांसाठी शेत मोकळे ठेवत कांदा बियाण्याची पेरणी केली. मात्र, अतिपाऊस व त्यात उन्हाचे चटके असे विषम हवामान तयार झाल्याने या बियाण्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कांदा रोप तयार करतेवेळी प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते. आधीच दहा ते बारा हजार रूपये पायलीचे महागडे बियाणे खरेदी करत ते शेतात टाकले आहे. परंतु, पावसाने त्याची लय बिघडवून टाकल्याने नवीन बियाणे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


‘पाणी आहे, भाव आहे पण कांदापिकासह बियाण्यावर करपा पडल्याने कांदापीक कसे काढावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर पाणीच पाणी करून दिले असले तरी कांदा पिकाला अडथळ्याची शर्यत करावी लागत आहे. या भागात तीन टप्प्यात कांदा पीक घेतले जाते. पोळ्याच्या टप्प्यात लागवड केली जाते. तो पोळ कांदा, दिवाळीच्या पूर्वार्धात लाल (रांगडा) व दिवाळीनंतर उन्हाळी कांदा लावला जातो. परंतु, यंदा परतीच्या पावसाने या पोळ व लाल कांद्याला फटका बसला आहे. पोळ कांदा काढणीवर आलेला असतांना व लाल कांद्याची तयारी सुरु असतानाच परतीच्या पावसाने धडाका लावल्याने करपा होऊन हे कांद्याचे पीक शेतातच खराब होत आहे. जादा पाणी, दव, धुके यामुळे कांद्याची पात खराब होऊन कांद्याची वाढ खुंटली आहे.

हेही वाचा: आदिमायेचा सप्तजयघोष… सप्तमीनिमित्त सप्तश्रृंगीगडावर भाविकांची गर्दी

लाल, उन्हाळी कांद्याची रोपे पुन्हा टाकावे लागणार असल्याने खर्च वाढणार आहे. कांद्याला भाव असल्याने सर्वच शेतकरी कांदा पीक घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, असे अडथळे येत असल्याने कांदा पीक घेण्यास मर्यादा पडत आहेत.
- जगन्नाथ पवार, वाखारी (ता. देवळा)

कांदा नगदी पीक असून, या भागातील शेतकऱ्यांचे ते हक्काचे पीक असते. परंतु, यंदा परतीच्या पावसाने कांद्याचे गणित बिघडले आहे. कांद्याचे उत्पन्न घेणे अवघड झाले आहे.
- किरण भामरे, युवा शेतकरी, खुंटेवाडी (ता. देवळा)

हेही वाचा: पुनूमियाची सिन्नरमध्ये जमीन; परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची चर्चा

loading image
go to top