esakal | नाशिक : गोदेची पाणीपातळी स्थिर; नदीकाठच्या व्यावसायिकांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari River

नाशिक : पावसाने उघडीप दिल्याने गोदावरीची पाणीपातळी स्थिर

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक : सोमवारपर्यंत (ता.१३) संततधार धरलेल्या पावसाने मंगळवारी (ता.१४) सकाळपासून उघडीप दिल्याने गोदावरीची पाणीपातळी दिवसभर स्थिर राहिली. त्यातच पाटबंधारे विभागाने आणखी विसर्ग न वाढविल्याने नदीकाठच्या व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असल्याने पाटबंधारे विभागाने नदीपात्रात तीन टप्प्यांत पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत यंदा प्रथमच मोठी वाढ झाली होती.


त्यातच काल सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोचल्याने प्रशासनाने नदीकाठच्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशाराही दिला होता. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने व्यावसायिकांत घबराट होती. त्यामुळे अनेक टपरीधारकांनी रात्रीच टपऱ्या हलविण्यास प्राधान्य देत सुरक्षितता बाळगली होती. याशिवाय नदीकाठी पक्की दुकाने असलेल्या व्यावसायिकांनीही सावधानता बाळगत पाणीपातळीत वाढ झाल्यास रात्रीच दुकाने खाली करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने या व्यावसायिकांसह अनेकांना दिलासा मिळाला. हळूहळू पाणी पातळी कमी होऊ लागल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दोन वर्षांपूर्वीच्या स्मृती जागृत

गोदावरीला आतापर्यंत चार ते पाचवेळा महापूर आले, मात्र दोन वर्षांपूर्वी म्हणजे ४ ऑगस्ट २०१९ ला गोदावरीला महापूर आला होता. या वेळी गोदावरीचे पाणी थेट गणेशवाडीतील महापालिका शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचले होते. याशिवाय शहरातील सोमवार पेठ, सरकारवाडा, सराफ बाजारातही पोचून व्यावसायिकांसह रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे वाढलेल्या पाणीपातळीमुळे अनेकांच्या मनात धास्ती होती. परंतु आता पाऊस थांबल्याने नदीकाठच्या व्यावसायिकांसह नागरिकांतील भितीचे वातावरण कमी झाले आहे. मात्र, याही परिस्थितीत प्रशासनाने संबंधितांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: गुड न्यूज : पाणी संकट टळले! नगर, नाशिकची धरणे भरली


...अन्‌ भाकीत ठरले खरे

गत महिन्यापर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने महापालिका प्रशासनाने शहरासाठी काही प्रमाणात पाणीकपात जाहीर केली होती. याशिवाय आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचे नियोजनही केले होते. त्यावेळी पाणीकपात कशाची करता, आगामी काळात जोरदार पाऊस होणार असल्याचे भाकीत व्यक्त करत संभाव्य पूरस्थितीचे नियोजन करण्याचा सल्ला गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मनपा प्रशासनाला दिला होता. त्याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्धही झाले होते. श्री. शुक्ल यांनी व्यक्त केलेले भाकीत आता खरे ठरले असून, पाणीकपात सोडाच, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ प्रशासनावर आल्याची आठवण श्री. शुक्ल यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; ड्रोनने टिपलेली दृश्य; पाहा व्हिडिओ

loading image
go to top