esakal | गुड न्यूज : पाणी संकट टळले! नगर, नाशिकची धरणे भरली
sakal

बोलून बातमी शोधा

Darana Dam

गुड न्यूज : पाणी संकट टळले! नगर, नाशिकची धरणे भरली

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि. अहमदनगर) : आजचा दिवस नगर व नाशिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने भाग्याचा ठरला. जायकवाडीत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडण्याचे संकट टळले. दारणा, गंगापूर, भंडारदरा पाठोपाठ आज निळवंडे धरणही भरले. गोदावरी व प्रवरा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. दरम्यान, शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. त्यानंतर लगेचच आज सकाळी गोदावरी कालव्यातून पिण्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले.


गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात दमदार पावसाअभावी पाणी पातळी खालावली. आता पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने सर्व ओढे नाले व बंधाऱ्यांत पाणी सोडण्याचे नियोजन करता येईल. संभाव्य पाणी टंचाई टळणार आहे. गोदावरी नदीतून सोळा हजार, तर प्रवरा नदीतून सहा हजार क्सूसेक्सने पाणी जायकवाडी धरणाकडे निघाले आहे. तिकडे केवळ पाच टीएमसी पाण्याची तूट आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आगामी दोन-तीन दिवसांत ही तूट भरून निघेल. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचा विषय आज संपला. गोदावरी कालव्यांतून पुढील दीड महिना पिण्यासाठी आवर्तन सुरू ठेवता येईल. गोदावरी उजव्या कालव्यातून ५४० तर डाव्या कालव्यातून ३२५ क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले.


दारणा व गंगापूर ही दोन मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यातून अनुक्रमे दहा व पाच हजार क्यूसेक्स वेगाने पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. मुकणे ६१ टक्के भरले आहे. अन्य जवळपास सर्व छोटी धरणे भरली आहेत. नगर जिल्ह्यातील मुळा धरण भरण्यच्या मार्गावर असून, त्यातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर गेला आहे.

हेही वाचा: डिंभे, वडज, चिलवडी धरणे ओव्हर फ्लो!


गोदावरी कालव्यातून आज सकाळी तातडीने आवर्तन सोडले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सिंचन व पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय तातडीने घेण्यात आला.
- सागर शिंदे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, नाशिक

बंगालच्या उपसागरात दुसरे चक्रीवादळ निर्माण होते आहे. येत्या २८ सप्टेंबरपर्यंत जवळपास दररोज पावसाच्या शक्यता आहे. त्यामुळे सर्व धरणे पुन्हा ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
जायकवाडीसाठी वरील धरणांतून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यता आपण ‘सकाळ’च्या माध्यातून व्यक्त केली होती. आज हा अंदाज खरा ठरला.
त्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

हेही वाचा: अकोले : निळवंडे धरणातून दहा हजार क्युसेक्सने विसर्ग

loading image
go to top