Summer Heat : ‘एकमेका सहाय्य करू..’ची वाळवणाच्या कामांत प्रचिती; गृहिणींची लगबग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

house wife making dry food

Summer Heat : ‘एकमेका सहाय्य करू..’ची वाळवणाच्या कामांत प्रचिती; गृहिणींची लगबग सुरू

नरकोळ (जि. नाशिक) : उन्हाचे (Summer) चटके बसु लागताच गृहिणींची वाळवणाचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु झाली आहे. कुरडई, नागली, उडीद पापड, वडे, चकल्या,

वेफर्स, शेवया आदी पदार्थ बनविण्याची लगीनघाई कसमादेत पहावयास मिळत आहे. (due to summer heat housewives start making dry food nashik news)

विशेष म्हणजे, या वर्षभर पुरणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीसाठी ग्रामिण भागात गृहिणी आजही एकमेकांच्या मदतीला धावून जात असून त्यातून ‘एकमेका सहाय्य करू...’ची प्रचिती येत आहे.
दरम्यान, डाळींचे भाव वाढल्याने महिलांना पदार्थ तयार करण्यासाठी हात आखडते घ्यावे लागत आहे.

महाराष्ट्रात पुर्वी शेती मशागतीतुन विश्रांती मिळताच व पुढे लग्न कार्य असल्यास वाळवणाचे पदार्थ बनविले जात. हे वाळवणाचे पदार्थ वर्षभर घरात वेगवेगळ्या वेळी किंवा सणावारासह तळून वापरले जातात. हे पदार्थ घरात असावेत यासाठी महिलांची धडपड असते. सर्व खरीप-रब्बी पिके काढून आणल्यानंतर ग्रिष्म ऋतूमध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ तयार करण्यासाठी सरसावतात.

हे काम एकटी- दुकटीला जड वाटत असल्याने एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीचा प्रत्यय यानिमित्ताने ग्रामिण भागात येतो. गावागावांत महिला एकत्र येऊन हे पदार्थ बनवितात. शहरात यंत्र, उद्योग उपलब्ध व बाजारात तयार पदार्थ मिळत असल्याने आणि आता बचतगटांच्या समुह उद्योगातून पदार्थ उपलब्ध होत असल्याने विकत घेतले जातात. परंतु, ग्रामीण भागात आजही महिला हे पदार्थ घरीच तयार करतात.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दरम्यान, आता शेवया तयार करण्याचे यंत्र आल्याने त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच, काही महिला रोजंदारीवरही मदत करत असल्याने त्यांनाही रोजगार मिळत आहे. लग्न समारंभ असलेल्या घरांत हे पदार्थ बनविताना रंगीबेरंगी कुरडया आवर्जून केल्या जातात. विशेषत: मुलीच्या लग्नात रुखवत म्हणून या कुरडया व पापड लागतात.

वडे बनविण्यासाठीही विशेष श्रम घ्यावे लागतात. यामध्ये विविध प्रकारच्या डाळी एकत्र पाण्यात भिजवून, त्या मसाला, हिंग, जिरे आदींचे मिश्रण करून वड्याच्या गिरणीत सकाळी लवकर दळून झाल्यावर महिला चळणीच्या आधारावर प्लॅस्टिक कागद किंवा लोखंडी पत्र्यावर हे वडे तयार करतात.

डाळींचे भाव (प्रतिकिलो)
मठ डाळ, मुग डाळ : १२० रुपये
हरभरा डाळ : ७० रुपये.

टॅग्स :NashikWifesummer