Leonid Meteor Shower : ‘लिओनिड उल्कावर्षाव’ची शुक्रवारी पहाटे अनुभूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leonid meteor shower representative picture.

Leonid Meteor Shower : ‘लिओनिड उल्कावर्षाव’ची शुक्रवारी पहाटे अनुभूती

नाशिक : विविध खगोलीय घटनांविषयी खगोलप्रेमींमध्ये आकर्षण असते. नुकताच चंद्रग्रहणाचा आविष्कार ढगाळ वातावरणामुळे अनुभवता आला नव्‍हता. येत्‍या गुरुवारी (ता.१७) मध्यरात्रीनंतर अर्थात शुक्रवारी (ता.१८) पहाटेच्‍या सुमारास ‘लिओनिड उल्कावर्षाव’ची अनुभूती खगोलप्रेमींना अनुभवता येणार असून, ही त्‍यांच्‍यासाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. (Early Friday morning experience of Leonid Meteor Shower Nashik News)

मोकळ्या आकाशाखाली झोपून तेजस्वी दिसणारा उल्कावर्षाव पाहण्याचा सध्याचा काळ आहे. अचूक माहिती घेऊन मैदानातून किंवा उंच गच्चीतून हे मनोहारी अन्‌ वैज्ञानिक दृश्य पाहाता येऊ शकते. उल्कावर्षाव ही निसर्गाची विलोभनीय देणगी आहे. नोव्हेंबर महिना उल्कावर्षावाचा महिना म्हटला जातो. या महिन्यात छोटे-मोठे असे एकूण पाच उल्कावर्षाव दिसण्याची दाट शक्‍यता असते.

यामुळे दिसतो उल्‍कावर्षाव

उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे दिसतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडत जातो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या धुळीच्या मार्गातून जाते तेव्हा ही धूळ (खडक, धातू, वायू, बर्फ) पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचली जाते. या उल्का सरासरी ताशी ५० हजार किमीच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे खडक घर्षणामुळे जळायला सुरवात होते. आणि सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते. बहुतेक उल्का या आकाशात जळून जातात.

हेही वाचा: Tribal Cultural Festival : नाशिकमध्ये उद्यापासून आदिवासी सांस्कृतिक महोत्सव

असे करा उल्‍का निरीक्षण..

उल्का दिसणे ही जितकी सुंदर बाब आहे, तितकेच उल्का निरीक्षण करणे अवघड आहे. एका दिशेने पाहिल्यास उल्का दिसत नाही. उभे राहून उल्का पाहणे कठीण आहे. त्यामुळे पाठीवर झोपून किंवा आरामखुर्चीवरून पाहणे सोयीचे ठरते. त्यामुळे आपली नजर जास्त आकाश पाहू शकते. उल्का पाहण्यास दुर्बीण वापरता येत नाही. द्विनेत्री (बाइनाक्युलर) पण उपयुक्‍त ठरत नाही. उल्का निरीक्षण केवळ साध्या डोळ्याने सोयीचे आहे. शहराच्या दूर, जिथे कृत्रिम प्रकाश नसेल तिथेच जाऊन निरीक्षण केलेले उत्तम ठरु शकते. शहरातून उल्का निरीक्षण करण्यासाठी उंच इमारतीवरून चारही दिशेने क्षितिज दिसेल अशा ठिकाणी जावे.

"येत्‍या गुरुवारी (ता.१७) मध्यरात्री (शुक्रवारी पहाटे) तीनच्‍या सुमारास ईशान्य क्षितिजावर मघा नक्षत्रातून उल्कावर्षाव होताना दिसेल. यंदा आकाशात चंद्रप्रकाशाचा अडथळा येणार नाही. तासाला २०-२५ उल्का पडताना दिसण्याचा अंदाज आहे. शहराच्या बाहेर जाऊन निरीक्षण केल्यास उल्कावर्षाव चांगला दिसू शकतो. कुटुंब, मित्रांसह मी या खगोलीय घटनेची अनुभूती घेणार आहे." - सुदर्शन गुप्ता, खगोल अभ्यासक, नाशिक.

हेही वाचा: Bike Riding at Night : त्र्यंबकरोडवर रात्री रंगतो ‘धुमस्टाईल’ बाईकराईडचा थरार!