पूर्वांचल वसतिगृह शिबिरातून एकतेचा जागर
विद्यार्थ्यांची शोभायात्रा; पारंपरिक नृत्य, समूह गीत स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित तीनदिवसीय ‘पूर्वांचल वसतिगृह दिवाळी शिबिर २०२६’ जनमानसात पोहोचण्यासाठी शहरातून विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत ईशान्य भारतातील भारतातील आसाम, माणिपूर, नागालँड आदी राज्यातील विद्यार्थी सांस्कृतिक सादरीकरण करीत सहभागी झाले. शिबिराचे उद्घाटन महापौर हिमगौरी आडके यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, नाशिक शहर जिल्हा संघचालक डॉ. विजय मालपाठक आणि शिबिर कार्यवाह प्रशांत महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. अजित मराठे यांनी पूर्वांचल आणि उर्वरित भारत यांच्यातील भावनिक बंध अधिक दृढ होण्यावर भर दिला. शनिवारी सकाळी १० वाजता योगेश चकोर यांचे ''भारत की रक्षासिद्धता - पूर्वांचल परिप्रेक्ष्य'' या विषयावर व्याख्यान झाले. सायंकाळी विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली. शिबिरादरम्यान चित्रकला, कॅलिग्राफी, हस्तकला, बुद्धिबळ, पथनाट्य, पारंपरिक नृत्य आणि समूहगीत स्पर्धा रंगली. रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता प्रियांका भट यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर, तर दुपारी २.३० वाजता प्रशांत महामुनी यांचे ‘पूर्वांचलमध्ये करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन होईल. रविवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सोमनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाने व संपूर्ण वंदे मातरमने या शिबिराचा समारोप होणार आहे.