Nashik : मालेगाव हिंसाचार प्रकरणी आठ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

मालेगाव हिंसाचार प्रकरणी आठ जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : त्रिपुरातील मुस्लिमांवरील कथित अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरात झालेल्या दगडफेक, तोडफोड, खूनाचा प्रयत्न, दंगल व सरकारी कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व हिंसाचार प्रकरणी मंगळवारी (ता.१६) नव्याने आठ जणांना अटक करण्यात आली. यु ट्यूबवरुन प्रक्षोभक व्हिडिओ चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी अम्मार अन्सारी याला अटक करण्यात आली आहे.

आज अटक केलेल्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अतिक अहमद यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ४१ झाली आहे. यापूर्वी ३३ जणांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील इस्लामपुरा भागातील रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी (ता.१५) मध्यरात्री छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. यात काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे किंवा काय याची तपासणी सुरु असल्याचे अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.

हिंसाचारप्रकरणी आज शहर पोलिसांनी सात, आयशानगर पोलिसांनी एक अशा आठ जणांना अटक केली. दरम्यान किल्ला पोलिसांनी यु ट्यूबवरील प्रक्षोभक व धार्मिक भावना भडकविणारी चित्रफीत प्रसारित केल्याच्या गुन्ह्यात अम्मार अन्सारी या तरुणाला अटक केली. हिंसाचार प्रकरणात संशयित असलेल्यांना अटक करण्यासाठी तसेच दगडफेक व तोडफोडीच्या चित्रफिती पाहून संशयितांची ओळख पटविण्यासाठी सहा पथक गठित करण्यात आले आहेत. चित्रफीतपाहून ओळख पटल्यानंतर साक्षीदारांमार्फत खात्री झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराध व्यक्तीला अटक करण्यात येणार नाही. शहरवासीयांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन श्री. खांडवी यांनी केले.

loading image
go to top