
भाजप-मनसेची युती झाली तर आश्चर्य नको : एकनाथ खडसे
नाशिक : सध्या राज्यामध्ये काहीही व अनाकलनीय घडत आहे. त्यामुळे भाजप व मनसेची युती झाली तर आश्चर्य नको, अशी प्रतिक्रिया देताना माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा दूध संघावरील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. (Eknath Khadse statement Nashik Latest Political News)
महानुभाव पंथाच्या संमेलनानिमित्त आमदार खडसे नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जळगाव दूध संघावर राज्य सरकारने बेकायदेशीर प्रशासक मंडळ नियुक्त केले. चुकीच्या व खोट्या पद्धतीने चौकशी केल्या. त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारने प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द ठरविल्याने न्याय मिळाल्याचा दावा खडसे यांनी केला.
भाजपनेत्या पंकजा मुंडे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थ असून, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी त्यांना निमंत्रण दिले आहे. यावर बोलताना खडसे यांनी पंकजा यांनी स्वतः निर्णय घ्यायचा आहे. एवढ्या वर्षांपासून पक्षात काम करत असल्याने ते असा निर्णय घेतील, असे वाटत नाही, असे खडसे म्हणाले.
शिवसेने संदर्भात दाखल याचिकेत कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार चर्चा झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने न्यायालय निकाल देईल, असा दावा त्यांनी केला.
राजकारणात काहीही शक्य
सध्या राज्याच्या राजकारणात काहीही व अनाकलनीय घडते आहे. तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येईल, असे कोणाला वाटले नव्हते; मात्र ते झाले, हे खरे आहे. फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी देखील राज्यातील नागरिकांनी पाहिला.
एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील, याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. मात्र या घटकांमुळे जनतेचा राजकारणावरील विश्वास डळमळीत झाला आहे.