esakal | ज्येष्ठ महिलेला रात्री उपचाराविना परत पाठविले; रुग्णालयाला संतप्त नागरिकांचा घेराव

बोलून बातमी शोधा

satana hospital
ज्येष्ठ महिलेला रात्री उपचाराविना परत पाठविले; रुग्णालयाला संतप्त नागरिकांचा घेराव
sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि.नाशिक) : ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला सेवा न देता परत पाठविण्याचा प्रकार घडत असल्याने शहर व तालुक्यातील गरिब रुग्णांचे हाल होत आहेत. काय घडले नेमके ज्यामुळे नागरिकांत संताप पाहायला मिळाला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेवर उपचार केले नाही

गुरुवारी (ता.२२) रात्री अकराच्या सुमारास एका वृद्ध महिलेस शहरातील डॉ. व्ही. के. येवलकर यांनी उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. मात्र ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेवर उपचार केले नाहीत. किंवा दाखलही करून घेतले नाही. त्यामुळे महिलेची प्रकृती खालावली. या प्रकारामुळे संतप्त माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, डॉ. व्ही. के. येवलकर, शरद शेवाळे, राजू जगताप, पंडित अहिरे, संदीप खैरनार, भूषण सूर्यवंशी आदींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा पवार यांना घेराव घातला. डॉ. पवार यांना धारेवर धरत, शहरातील कोविड नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांना उपचार न देताच कोविड असल्याचे भासवले जाते.

सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ

रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नसल्याने उपचार करणे शक्य नसल्याची कारणे देत रुग्णांना परत पाठविले जाते. मात्र आर्थिक परिस्थिती नसताना रुग्णांना मालेगाव अथवा नाशिक येथे महागड्या उपचारांसाठी जाणे अशक्य होते. त्यामुळे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ग्रामीण रुग्णालय प्रशासन करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी आपण सर्व रुग्णांना उपचारांसाठी दाखल करून घेत असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व आंदोलकांमध्ये समन्वय साधला.

राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव

सटाणा शहरात लोकसंख्येच्या विचार करता एकही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णलयाच्या ३० खाटा त्यासाठी वापरल्या जाव्यात. त्यामुळे तालुक्यातील डांगसौंदाणे येथे कोविड रुग्ण पाठविण्याची गरज भासणार नाही, अशी मागणी डॉ. येवलकर यांनी केली.उपचारांविना रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २३) उघडकीस आल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा पवार यांना घेराव घालून आंदोलन छेडले.