मेन
फोटो : H33436
--
मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घ्या
विरोधक, सामाजिक संघटनांचा एल्गार; एसआयआर प्रक्रिया रद्दची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, मतदारयादी विशेष पुर्नरिक्षण प्रक्रिया (एसआयआर) तातडीने रद्द या प्रमुख मागण्यांसाठी विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी (ता. २४) मोर्चा काढला. या वेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
देशभरात सध्या एसआयआरचा मुद्दा गाजत आहे. या प्रश्नावरून शहरातील विरोधी पक्ष व सामाजिक संघटनांनी देशातील ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चा काढला. या मोर्चाप्रसंगी एसआयआर प्रक्रियेवर बोट ठेवताना ती लोकशाही मूल्य आणि नागरिकांना मतदानाच्या मूलभूत हक्काला थेट धक्का लावणारी ठरल्याचा आरोप करण्यात आला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांमधून सुमारे १३ कोटी नागरिकांची नावे संशयास्पदरीत्या वगळल्याने ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भिती आहे. निवडणूक आयोगातील इतर आयुक्तांनी या कार्यपद्धतीवर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले असताना त्याची दखल का घेतली नाही. तसेच वय आणि पत्त्याच्या विसंगतीचे कारण देत लाखो मतदारांना नोटिसा बजावत मानसिक त्रास दिला जात आहे, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले.
सीबीएस येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवाजी रोड, नेहरू गार्डन, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोर्चात खासदार डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश खैरे, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे व भारत टाकेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे, भाकपचे डी. एल. कराड, राजू देसले, मनसेचे राकेश परदेशी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
---चौकट
जोरदार घोषणाबाजी
मोर्चात काँग्रेस, माकप, भाकप, मनसे, आम आदमी पक्षासह विविध राजकीय पक्ष व संघटना सहभागी झाल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ज्ञानेश कुमार राजीनामा, राजीनामा द्या. सरकार जब जब डरती है पोलीस को आगे करती हे अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. एसआयआर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी आदी प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या.
---------------