Nashik : सातपूरमधून निवडणुकीचा बिगुल वाजला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

सातपूरमधून निवडणुकीचा बिगुल वाजला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातपूर : हिंदू समाजामध्ये प्रामाणिकपणा, विश्वास, प्रेम हे गुणवाचक आहे. त्रिपुरा येथे नुकत्याच घडलेल्या घटनेचा धागा पकडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. तसेच, महापालिका निवडणुकीचा सातपूरमधून बिगुल वाजला असल्याचे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

प्रभाग नऊमध्ये नगरसेवक दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने श्रमिकनगर येथे चार एकर परिसरात उभारलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उमेश पाटील, संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते कमलेश बोडके, शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक रवींद्र धिवरे, नगरसेविका वर्षा भालेराव, माजी नगरसेविका लता पाटील, बोधले महाराज, अनिल महाराज, अतुल नेवासकर महाराज, निवृत्ती महाराज, महंत चिरडेबाबा, महंत मराठीबाबा बाबूराव लोणारकर, भाजप युवा मोर्चाचे अमोल पाटील व सामाजिक कार्यकर्ते विष्णू पाटील उपस्थित होते

भारताचा विकास करायचा असेल, तर मूलभूत सुविधा अधिक बळकट होणे गरजेचे आहे. या विचाराने या इमारतीची उभारणी केली आहे, असे सांगत कोरोनाचे संकटात अद्याप टळले नसून प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या वेळी केले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, की मोदी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळू लागले. अतिवृष्टी झाली मात्र अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. यामुळे नागरिक तुलना करू लागले असून, महाविकास आघाडी सरकारवर पश्चात्ताप करत असल्याचे दानवे म्हणाले.

प्रास्ताविकात बोलतान दिनकर पाटील म्हणाले, की शहरात मनपाच्या एकूण १२८ शाळा असून सद्यःस्थितीत ४० हुन अधिक शाळा बंद पडण्याच्या मार्गांवर आहे. १९९३ पासून पाठपुरावा करून पिंपळगाव शिवारात येणाऱ्या श्रमिकनगर येथे शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर शाळा उभारली. शिवाजीनगर व श्रमिकनगर येथील महापालिका शाळेत एकूण २५०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, या वेळी शाळा इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. अमोल पाटील यांनी आभार मानले. या वेळी गायक मिलिंद शिंदे व मधुर शिंदे यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला.

एवढी गर्दी कुठेच पाहिली नाही

या वेळी शिवसेनेचे ॲड. महेश शिंदे, दीपक आरोटे, साहेबराव दातीर व संदीप तांबे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. या वेळी श्री. दानवे खास शैलीत म्हणाले, की राज्यभर फिरतो; पण एखाद्या नगरसेवकाच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आलेली गर्दी कुठेच पाहिली नाही. एवढी गर्दी आमदारकीच्या निवडणुकीत जमवली जाते. चंद्रकांतदादांकडे इशारा करत दिनकररावांनी ही आता सर्वांचे लक्ष वेधले असले तरी यामागे पाटलांचा इशारा मात्र मनपा निवडणुकीबरोबर अजून दुसराही आहे, असे सांगताच सभा मंडपात हसू फुलले.

loading image
go to top