(पान ४ ला ॲंकर)
WRS26B02823
मल्याचा पाडा (ता. साक्री) : मॉकड्रिल करून मार्गदर्शन करताना पदाधिकारी व उपस्थित नागरिक.
----------
मल्याचा पाड्यात आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणाचे प्रात्यक्षिक
नागरिक- विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे; पाइपलाइन लिकेजपासून आगीपर्यंत इंडियन ऑईलचे ‘मॉकड्रिल’
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. ३ : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, पश्चिम क्षेत्र, मनमाड व बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने पाइपलाइन सुरक्षेबाबत जनजागृती आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांचे मॉकड्रिल मल्याचापाडा येथे घेण्यात आले. पाइपलाइनला गळती लागल्यापासून आग लागण्याच्या परिस्थितीपर्यंत निर्माण होणाऱ्या आपत्कालीन प्रसंगावर नियंत्रण कसे मिळवावे, याचे थरारक प्रात्यक्षिक नागरिक व विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.
नवापूर रोडलगत मल्याचापाडा परिसरात झालेल्या या मॉकड्रिलमध्ये पाइपलाइनमधून पेट्रोलियम पदार्थाची गळती झाल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती देणे, घटनास्थळ सुरक्षित करणे, नागरिकांना धोक्याच्या क्षेत्रापासून दूर हलविणे आणि त्यानंतर आवश्यक ती आपत्कालीन कार्यवाही करण्याची प्रक्रिया दाखविण्यात आली.
पाइपलाइनला गळती झालेल्या परिसरात अनधिकृत व्यक्तींनी प्रवेश करू नये, धूम्रपान किंवा आग पेटवू नये. तसेच, ठिणगी निर्माण होईल, अशी कोणतीही कृती टाळावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पाइपलाइन परिसरात आग लागल्यास अग्निशमन पथकाकडून कोणत्या पद्धतीने कार्यवाही केली जाते, याचेही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे, संबंधित सुरक्षा यंत्रणेला तातडीने माहिती देणे आणि प्रशासनाच्या सूचनांनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे महत्त्वाचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पाइपलाइन परिसरात गळती, अपघात किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून घटनास्थळी न जाता संबंधित अधिकारी व सुरक्षा यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मोठी दुर्घटना घडल्यास संभाव्य धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षित स्थलांतराची कार्यपद्धती याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गळती झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीमध्ये प्रशिक्षित तांत्रिक पथकाची भूमिका, तसेच वेल्डिंगच्या कामादरम्यान घ्यावयाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.
या वेळी पोलिस उपनिरीक्षक शिरसाठ, सरपंच अश्विनी चौधरी, पोलिस पाटील विशाल आंबेकर, माजी सरपंच हरीभाऊ आंबेकर, तलाठी संजय पवार, मंडल अधिकारी विजय जगदाळे यांच्यासह इंडियन ऑईलचे अधिकारी- कर्मचारी, स्थानिक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
------------
आपत्कालीन माहिती
दिल्यास सन्मान
पाइपलाइन परिसरात अनधिकृत उत्खनन, बांधकाम, पाइपलाइनला इजा, गळती किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची तातडीने माहिती इंडियन ऑईलच्या संबंधित यंत्रणेला द्यावी. अशा घटनांची वेळेत माहिती देणाऱ्या नागरिकांना कंपनीकडून योग्य ते बक्षीस व सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. मॉकड्रिलमुळे स्थानिक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना पाइपलाइन सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीतील खबरदारी आणि संकटाच्या वेळी तातडीने माहिती देण्याचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजले.