
Epidemic Disease : थंडीसह शीतलहरींमुळे साथीचे आजार बळावले; बालकांच्या आजारात वाढ
सिन्नर : कुटुंबातील चिमुकल्यांचा वायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या, डायरिया वाढत आहे. पालकांनी आपल्या पाल्याचे या आजारांपासून संरक्षण कसे करता येईल, हे लक्षात घेतले पाहिजे.
सर्दी, खोकला, ताप, उलट्या होणे हे आजार बालकांमध्ये दिसत आहेत, त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयातील बालरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात एक वर्षात अंदाजे पाच बालकांवर उपचार करण्यात आले. यात 50 टक्क्यांवरील बालकांना सर्दी, खोकल्यामुळे रुग्णालयात यावे लागले.
त्याचबरोबर श्वसनाच्या आजारासह डायरिया, कानाचे इन्फेक्शन, कुपोषणासह अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. बालकांना सर्दी, खोकला झाला की अनेक पालक परस्पर औषधी दुकानातून औषधी घेऊन बालकांना देतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बालकांना औषध देऊ नये.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा उपचार
ग्रामीण रुग्णालयात एका वर्षात बालरोग विभागाच्या ओपीडीत पाच हजार बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील एक हजार रुग्ण सर्दी, खोकला, उलट्या होणे या आजाराचे होते. औषध दुकानदारही विविध आजारांचे ज्ञान असल्याचा अविर्भाव आणून त्यांना औषधी देतात. मात्र अशा औषधीमुळे अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉक्टरांना दाखवूनच औषधी घेणे चांगले असते. अनेकदा तापात बालकांना झटके येतात. ग्रामीण रुग्णालयात असे रुग्ण बरेच येतात. बाळाचा ताप वाढू लागला, की अनेकदा घरीच ताप उतरविण्यासाठी सुचतील ते उपाय केले जातात. पण हे योग्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. बालकामध्ये श्वसनासंबंधी आजाराचे प्रमाण खूप आहे.
छातीत घरघर, सर्दी होणे, धाप लागणे, कोरडा खोकला, नाक वाहने, चिडचिड होणे आदी त्रास बालकांना होतात. यासाठी घरात हवा खेळती असावी. बाहेर अन्नपदार्थ खाऊ नये तसेच सतत स्वच्छ हात धुवावे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या बाल रुग्णांमध्ये काहीअंशी डायरियाचे प्रमाण दिसत आहे.त्यासाठी मुलांना भरपूर पाणी द्या. बालकांनी ओआरएसचे पाणी पिणे, थोड्याथोड्या वेळाने पाणी पिणे, नारळ पाणी द्यावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे योग्य समतोल राहिला पाहिजे.
''सद्यःस्थितीत सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढले असून, त्यामध्ये बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरी सर्व पालकांना विनंती आहे, की कुठल्याही प्रकारचे खोकला, सर्दी आपल्या पाल्याला असेल तर घरगुती औषध उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार करावे. गरज भासल्यास आवश्यक त्या रक्त, लघवीच्या चाचण्या करून घ्यावे. - डॉ. चेतन ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, सिन्नर