Nashik : यंदाही कार्तिक स्वामी महोत्सव बंद दाराआडच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाही कार्तिक स्वामी महोत्सव बंद दाराआडच

यंदाही कार्तिक स्वामी महोत्सव बंद दाराआडच

पंचवटी : दरवर्षी श्री कार्तिक स्वामी मंदिरात होणारा महोत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही, तर पोलिसांनी या वर्षीही परवानगी नाकारल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही. निवडक पुजारी व विश्‍वस्तांच्या उपस्थितीत मंदिरातील पूजाविधी व अभिषेक पार पडणार आहे. शिवाय दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा हरिहर भेट महोत्सवही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

काशी नाट्टकोटीई नगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीकडून कार्तिक स्वामी महोत्सवासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. कार्तिक पौर्णिमा व कृतिका नक्षत्राला होणाऱ्या पूजा व अभिषेक यांच्या संदर्भातील पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले होते. सोहळ्यास भाविकांची दर्शनासाठी व मोरपीस अर्पण करण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे आयोजनासाठी पोलिस आयुक्तांकडे विश्वस्तांनी परवानगी मागितली होती. मात्र, कोरोनाचा धोका असल्याने व या काळात मोठी गर्दी होत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिसबळाची गरज असते. सध्या पोलिस संख्या कमी असल्यामुळे या सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात बॅरिकेटस् लावण्यात आलेले आहेत.

केवळ मंदिरातील अंतर्गत पूजा करण्यात येण्यात येणार आहे. भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही. कार्तिक पौर्णिमेस गुरुवारी (ता. १८) दुपारी बारा वाजता सुरवात होईल. या वेळी तीळ, तेल, मध, दही, तांदूळ पीठ, हळद, चंदन, तूप, मोसंबीचा रस, उसाचा रस, नारळपाणी, डाळिंबाचा रस, संत्री रस, जल आदींचा अभिषेक करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १९) दुपारी दोन वाजून २८ मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असून, रात्री एक वाजून २९ मिनिटांपासून ते शनिवारी (ता. २०) रोजी पहाटे चार वाजून २९ मिनिटांपर्यंत कृतिका नक्षत्र आहे.

हरिहर भेट महोत्सवावर निर्बंध

देवदिवाळी उत्सवाचे औचित्य साधत दरवर्षी श्री कपालेश्‍वर देवस्थान व श्री सुंदर नारायण देवस्थानतर्फे हरिहर भेट सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी गर्दी टाळण्याचे निर्देश असल्याने हा सोहळा निवडक लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या महोत्सवबाबत भक्तांमध्ये मोठा उत्साह असतो. मात्र, कोरोना सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ शकला नाही.

loading image
go to top