Latest Marathi News | तासिका तत्वावरील प्राध्यापकांची परीक्षाविषयक कामांतून मुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CHB Professor

Nashik : तासिका तत्वावरील प्राध्यापकांची परीक्षाविषयक कामांतून मुक्ती

नाशिक : तासिका तत्वावरील प्राध्यापकांना परीक्षा आणि मूल्यांकनाचे कामे देता येणार नाहीत, असे महाराष्ट्र शासनाने एका निर्णयाद्वारे नुकतेच स्पष्ट केले आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या सेवाशर्तीविषयी सविस्तर माहिती या निर्णयात देण्यात आली आहे. (Exemption of hourly professors from examination duties Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Citylinc Training : सिटीलिंक चालक- वाहकांसाठी मार्गदर्शन शिबिर

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तासिका तत्वावरील प्राध्यापकांना यापूर्वी परीक्षा, पर्यवेक्षण आणि मूल्यांकनाच्या कामासाठी जुंपले होते. शासनाचा निर्णय पाहता परीक्षा आणि मूल्यांकनाचे काम यापुढे नियमित आणि कायमस्वरुपी प्राध्यापकांनाच द्यावे लागणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीचे धोरण ठरविण्यासाठी उच्च शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक सहा सदस्यीय समिती १० ऑगस्ट २०२१ च्या निर्णयानुसार स्थापन करण्यात आली होती. या समितीने एकूण नऊ शिफारशी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी केल्या होत्या. त्यापैकी काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या, तर काही नाकारण्यात आल्या.

तासिका तत्वावरील प्राध्यापकांनी विद्यापीठ आयोगाने विहित केलेली अहर्ता धारण करणे, नियुक्तीची कार्यपद्धती विहित करणे, मानधनात वाढ करणे, मानधन थेट बँक खात्यात जमा करणे आणि शिल्लक कार्यभारावर नियुक्ती करणे या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. अनुभव प्रमाणपत्र देणे, परीक्षाविषयक पर्यवेक्षण आणि मूल्यांकनाचे काम देणे, पुनर्नियुक्तीसाठी नव्याने कार्यपद्धती राबवू नये आणि आरक्षण धोरणानुसार नियुक्ती करणे या शिफारशी शासनाने नाकारल्या आहेत.

तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात शासनाने कार्यपद्धती निश्चित करुन दिली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवसांपासून नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी नियुक्तीस मान्यता मिळवून घेण्याचे निर्देश महाविद्यालये आणि विद्यापीठांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Causes of Divorce: कमी पगार ठरतोय घटस्फोटाला कारण, पाच वर्षात तब्बल दहा हजार घटस्फोट